११ गावांनी नाकारला बंदोबस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:21 IST2017-08-21T01:21:15+5:302017-08-21T01:21:56+5:30
वाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.

११ गावांनी नाकारला बंदोबस्त!
आज पोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.
गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात केली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये समित्यांचे गठण झालेले आहे. त्यानुसार, सणोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गाव एक दुर्गादेवी’, पोलीस बंदोबस्ताविना पोळा, गुलाल आणि डीजे विरहित मिरवणूक, अशा संकल्पना समितीसमोर ठेवण्यात आल्या. त्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर लाखो रुपयांची बक्षिसे देखील दरवर्षी तंटामुक्त गाव समित्यांना दिले जातात. जिल्ह्यातील अनेक गावांनी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त केले; परंतु सामाजिक उपक्रम राबविण्यास तंटामुक्त गाव समित्या कमी पडत असून, जिल्ह्यातील केवळ ११ गावांनी पोळा सणाला बंदोबस्त नाकारल्यावरून ही बाब सिद्ध होत आहे.
मानोरा तालुक्यातून कारखेडा गावाने पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. यासाठी तेथील तंटामुक्तीचे अध्यक्ष धम्मदीप ढवळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी पुढाकार घेतला. वाशिम तालुक्यात कुंभारखेडा, मालेगाव तालुक्यात केळी आणि रिसोड तालुक्यातील आठ गावांचा पोलीस बंदोबस्त नाकारण्यात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जनावरे आजारी; पिंपरीमध्ये यंदा भरणार नाही पोळा!
पिंपरी अवगण (ता.मंगरूळपीर) येथे गेल्या आठ दिवसांपासून अज्ञात आजाराची लागण झाली असून, यात १0 जनावरे दगावली आहेत. दरम्यान, गावातील गुरांचे लसीकरण करण्यात आले; परंतु एकापेक्षा अधिक जनावरे जवळ आल्यास आजाराची लागण वाढू शकते, ही बाब लक्षात घेऊन गावातील पोळा यंदा रद्द ठेवण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला आहे.