महिलादिनीच प्रसूतीसाठी महिलेची ५ तास धावपळ; डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पाठवले खासगी रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:44 IST2026-03-09T10:44:01+5:302026-03-09T10:44:19+5:30
डहाणू उपजिल्हा रुग्णालयात रविवारी मध्यरात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि जोखमीची प्रसूती असल्याचे सांगत अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला.

महिलादिनीच प्रसूतीसाठी महिलेची ५ तास धावपळ; डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पाठवले खासगी रुग्णालयात
बोर्डी/पालघर : डहाणू उपजिल्हा रुग्णालयात रविवारी मध्यरात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि जोखमीची प्रसूती असल्याचे सांगत अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. मात्र मध्यरात्री रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रिक्षा शोधण्यापासून कुटुंबीयांना पाच तास धावाधाव करून खासगी रुग्णालयात नेऊन प्रसूती करण्याची वेळ आली.
डहाणू शहरातील वडकून येथे राहणाऱ्या दर्शना माच्छी (२५) या दुसऱ्या खेपेच्या गर्भवतीला शनिवारी रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्यावर कुटुंबीयांनी तिला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जोखमीच्या प्रसूतीसाठी गुजरात राज्यात नेण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला. तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उशीर होईल, अशी माहिती देण्यात आल्याने नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गर्भवतीच्या कुटुंबीयांनी १०८ नंबरवर कॉल करून रुग्णवाहिकेची नोंदणी केली. मात्र सेवेसाठी किमान दीड दोन तास लागतील, असे उत्तर मिळाले. यानंतर अंगणवाडी सेविका आणि स्थानिकांच्या मदतीने महिलेला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ
सुरू केली.
नातेवाइकांकडून संताप व्यक्त
संबंधित महिला मागील नऊ महिन्यांपासून कॉटेज रुग्णालयात नियमित तपासणी आणि उपचार घेत होती. मात्र ऐन प्रसूतीच्या वेळी सरकारी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिला अशा प्रकारे धावपळ करण्याची वेळ ओढवल्याने नातेवाइकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे मध्यरात्र उलटून महिला दिनाच्या शुभेच्छांना सोशल मीडियावर सुरुवात झाली असताना दर्शना मात्र डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे प्रसूतीसाठी कळवळत होती. जिल्हा निर्मितीला १२ वर्षे झाली. मात्र आरोग्य व्यवस्था अद्यापही बळकट झालेली नाही, अशी टीका यानिमित्ताने नातेवाइकांकडून करण्यात आली.
...अन् गोंडस बाळाचा जन्म
सर्वप्रथम एका खासगी रुग्णालयामध्ये नेले; मात्र तेथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नंतर अन्य रुग्णालयातही डॉक्टर उपलब्ध नसल्याने शेवटी त्या महिलेला तिसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत महिलाची सिझेरियन प्रसूती केली. या प्रसूतीत ३.१७० किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला असून, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
मी स्वतः रुग्णालयात जाऊन या घटनेची चौकशी करणार आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
डॉ. रामदास मराड,
जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर
दोन दिवसांपूर्वी अपघातात जखमी वाणगाव येथील पाच महिन्यांच्या गर्भवती आदिवासी महिलेला या उपजिल्हा रुग्णालयात उपचारापासून वंचित ठेवले होते. अखेर खासगी रुग्णालयात मध्यरात्री दाखल करावे लागले. उपचार मिळावेत म्हणून आम्हाला झगडावे लागले.
संदेश पाटील, समाजसेवक, डहाणू