पालघर जिल्ह्यात नियोजनाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 08:29 IST2025-05-05T08:29:21+5:302025-05-05T08:29:28+5:30

जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो.

Water scarcity in Palghar district due to lack of planning! | पालघर जिल्ह्यात नियोजनाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष !

पालघर जिल्ह्यात नियोजनाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष !

- हितेन नाईक
पालघर समन्वयक
पालघर जिल्ह्यात नद्या, धरणे आणि लघुपाटबंधारे योजनेतून मोठा पाणीसाठा उपलब्ध असतानाही गेल्या ४० वर्षांपासून मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाड्यासह जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांतील गावपाड्यांत पाणीटंचाईची भीषण दाहकता आहे. पाण्याचे शाश्वत स्रोत उपलब्ध असतानाही पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या अभावामुळे एक भांडे पाण्यासाठीही महिलांना तळ गाठलेल्या विहिरीत धोका पत्करून उतरावे लागते, असे भीषण चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात सूर्या, वैतरणा, तानसा या बारमाही वाहणाऱ्या नद्या, पाणी साठवणारे धामणी, कवडास, वांद्री प्रकल्प धरणे तसेच ६ लघु पाटबंधाऱ्यात ओव्हरफ्लो होतील इतका पाणीसाठा असतो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २,३६७ मिलिमीटर इतका पाऊस होतो, तरीही मार्च सुरू होताच इथल्या महिला पाण्यासाठी खाचखळग्याची वाट तुडवत, डोक्यावर हंडा घेऊन आजही वणवण फिरत असतील तर त्यांच्या एक एक पाण्याच्या थेंबाची व्यथा सरकारला कळत कशी नाही? हा खरा प्रश्न आहे.

योग्य नियोजनाच्या अभावाने ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. स्थानिकांच्या नजरेसमोर इथले पाणी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई- विरार येथे मोठ्या पाइपलाइनद्वारे नेले जाते. मात्र उपलब्ध असणाऱ्या धरण आणि लघुपाटबंधारे योजनेच्या जवळच्या गावांतील लोकांना पाइपलाइनद्वारे घराघरांत पाणी देणे का शक्य होत नाही? हा प्रश्न अनुत्तरितच आहे; परंतु सहजसोपा मार्ग अवलंबण्याऐवजी जलजीवन मिशनच्या ‘हर घर नल से जल’द्वारे कोट्यवधींचा निधी खर्च करूनही मागील चार-पाच वर्षांपासून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण व्हायला अजून दोन वर्षे स्थानिकांना ताटकळत राहावे लागणार. याची जबाबदारी निश्चित केली जात नाही. 

संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने ही योजना आरोप-प्रत्यारोप करत कासवाला लाजवेल इतक्या धीम्या गतीने सुरू आहे.  
सूर्या नदीतून डहाणू तालुक्यातून वेती येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असून, ते पाणी मीरा-भाईंदर, वसई-विरार येथे नेले जात असताना त्याच योजनेतून डहाणू तालुक्यातील ४ गावे आणि पालघर तालुक्यातील ११ गावे अशा १५ गावांना पाणी देणे सहज शक्य असल्याचे कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी सांगितले. मात्र, तेथील स्थानिकांच्या डोळ्यादेखत त्यांचे पाणी इतरत्र वळवताना त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत डहाणू तालुक्यातील १७४ गावांसाठी १२ योजना, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ६० गावांसाठी ९ योजना कार्यान्वित करण्यात केली तरी या जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ झाल्याने महिलांना आजही भरदुपारी पाण्यासाठी डोंगरमाथ्यावर वणवण फिरावे लागते. एमएमआरडीएच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा व्हावा अशा १५ गावांतील लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती स्थानिकांची आहे. स्थानिकांच्या घशाला पडलेली ही कोरड दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी एकत्र येत नसल्याची खंत मात्र नागरिक बोलून दाखवतात. 

जिल्ह्यामध्ये एकूण ८ तालुक्यांत ४७३ ग्रामपंचायती आणि ८९९ गावे आहेत, तसेच ४,७१० वाड्या असून एकूण लोकसंख्या १७,४९,२१० इतकी आहे. एकूण ग्रामीण कुटुंबांची संख्या ४,५२,०४३ इतकी आहे. ३,०७,९९५ कुटुंबांना नळजोडणी पुरवली आहे. जिल्ह्यातील एकूण ८९९ गावांपैकी ६१४ गावांना ५६२ योजनांद्वारे जिल्हा परिषद पालघरअंतर्गत तर २६ योजनांद्वारे २८२ गावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत जलजीवन मिशन योजनेतून पाणी देण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Water scarcity in Palghar district due to lack of planning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी