वारली चित्रकला जगप्रसिद्ध करणारा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:08 AM2018-05-16T06:08:20+5:302018-05-16T06:08:20+5:30

थोर वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांचे मंगळवारी पहाटे डहाणू तालुक्यातील गंजाड गावात कलमीपाडा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

Warli painting world famous | वारली चित्रकला जगप्रसिद्ध करणारा हरपला

वारली चित्रकला जगप्रसिद्ध करणारा हरपला

googlenewsNext

डहाणू : वारली या आदिवासी जमातीच्या वैशिष्ठ्यपूर्ण चित्रकलेला ‘वारली चित्रकला’ अशी स्वतंत्र ओळख देत ती जगभर प्रसिद्ध करणारे थोर वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांचे मंगळवारी पहाटे डहाणू तालुक्यातील गंजाड गावात कलमीपाडा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने ‘पद्मश्री’ व राष्ट्रपती पदक देऊन गौरविलेले जिव्या सोमा ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पवणी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची दोन मुले त्यांचा समृद्ध कलावारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत.
घरात लग्नकार्य असले की कुडाच्या भिंती सारवून त्यावर घरातील स्त्रियांनी आपले भावविश्व चितारायचे ही वारली समाजाची शेकडो वर्षांची परंपरा. जिव्या सोमा यांनी एक प्रकारे बंडखोरी करून आदिवासी पाडे आणि त्यातही फक्त महिलांपुरती मर्यादित असलेली ही कला खऱ्या अर्थाने मुक्त केली. घरातील महिलांच्या सोबत त्यांनीही वयाच्या १३व्या वर्षी कुंचला हाती धरला आणि पुढील सलग ६६ वर्षे त्या कुंचल्यातून त्यांची अफाट सृजनशीलता अखंडपणे झिरपत राहिली. त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून वारली समाजाचे खास असे पारंपरिक नृत्यप्रकार, तारपासारखी अनोखी वाद्ये आणि रुढी-संस्कार आणि गिरीकन्नरीचे विलोभनीय निसर्गसौंदर्य जगाच्या कानाकोपºयात पोहोचले.
जिव्या सोमा हे युगप्रवर्तक होते. त्यांच्यामुळे वारली चित्रकला केवळ जगन्मान्य झाली एवढेच नव्हे तर ती शहरी लोकांनीही मनापासून स्वीकारली. आज वारली चित्रकलेची वस्त्रप्रावरणे उच्चभ्रू समाजातही ‘फॅशन’ म्हणून वापरली जातात व या कलेने सजविलेल्या अनेक शोभिवंत वस्तूंना बख्खळ बाजारपेठ निर्माण झाली आहे, याचे सारे श्रेय जिव्या सोमा यांच्याकडे जाते.
इंदिरा गांधींनी हा हिरा हेरला आणि त्यास जगापुढे आणले. जिव्या सोमा यांनी त्या संधीचे सोने केले व जगाच्या अनेक देशांमध्ये दौरे करून तेथे प्रतिष्ठित कलादालनांत आपली कला प्रदर्शित केली. वयोमानानुसार गेली काही वर्षे जिव्या सोमा थकले. पण त्यांचा एक मुलगा जपानी लोकांना ही कला शिकविण्यासाठी दरवर्षी तेथे तीन महिने कार्यशाळा घेत असतो.
>शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मंगळवारी दुपारी घराजवळच्या शेतात जिव्या सोम्या यांच्या तिरंग्यात गुंडाळलेल्या पार्थिवावर शासकीय इतमामात व आदिवासी रिवाजांनुसार अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची सलामी दिली. मुलगा सदाशिव याने पित्याला अग्नि दिला. यावेळी पालघर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे-पाटील, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर आणि तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते. त्याआधी आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार रवींद्र फाटक, अमीत घोडा, संजय पोतनीस, मंगेश कुडाळकर तसेच माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
>सन्मान आणि पुरस्कार
१९७५ : भास्कर कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मुंबईतील जहांगीर
आर्ट गॅलरीत वारली चित्रकलेचे
पहिले प्रदर्शन.
१९७६ : पॅरिसमधील पॅलेस दि मॉन्टेन कलादालनात देशाबाहेरील पहिले प्रदर्शन.
१९७६ : आदिवासी चित्रकलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार.
२००१ : कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’
२००२ : शिल्पगुरू पुरस्काराने सन्मानित.
२००२ : प्रिन्स क्लाउस पुरस्कार.
२००९ : नेदरलँडचे राजे प्रिन्स क्लाऊस यांच्यास्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार.
>दुर्गम भागातील वारली चित्रकला त्यांनी सातासमुद्रापार पोहोचविली. त्यांच्या धडपडीमुळे वैशिष्ठ्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे विविध पदर उलगडले. आज वारली चित्रकला ख्यातीप्राप्त झाली आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>त्यांनी आपल्या चित्रांमधून आदिवासी समाजाचे जीवन व चालीरिती जगापुढे आणल्या. ते वारली चित्रकलेचे चालते-बोलते विद्यापीठच होते. त्यांची कला जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल

Web Title: Warli painting world famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.