उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 03:57 PM2024-06-12T15:57:46+5:302024-06-12T16:07:05+5:30

टीडीपी प्रमुख एन च्रंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नायडू यांचा हा चौथा कार्यकाळ आहे. याआधीही चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यांच्यानंतर जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री झाले होते.

आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळात अभिनेता आणि जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनीही नायडू यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. पवन कल्याण हे नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील तर चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यानेही मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे.

नायडू यांनी शपथ घेतल्यानंतर मोठे काम केले, त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मुलगा नारा लोकेशचा सहभाग करून घेतला. एक प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतो. वडिलांच्या नेतृत्वात लोकेश पक्षासोबतच सरकारमधील अनेक बारकावे समजून घेऊ शकतो.

नायडू नव्हे तर यापूर्वी अनेक प्रादेशिक पक्षांनी हे काम केले आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांना थेट कॅबिनेट मंत्रि‍पद देण्यात आलं होतं. सुरुवातीला या निर्णयावर विरोधकांनी टीका केली. मात्र कालांतराने आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळात राहून अनेक गोष्टी समजून घेतल्या.

राजकीय इतिहास काढला तर पंजाबमध्ये अकाली दलाचं सरकार असतानाही तेव्हाचे नेते मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल यांना उपमुख्यमंत्री बनवलं होतं. याचप्रकारे २००६ ते २०११ पर्यंत तामिळनाडूत हे घडले.

तामिळनाडूत डिएमके सरकार होतं. त्यावेळी एम करूणानिधी मुख्यमंत्री होते तर त्यांच्या मंत्रिमंडळात मुलगा स्टॅलिन सहकारी म्हणून काम करत होते. मात्र बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यात प्रमुख प्रादेशिक पक्षांनी अशाप्रकारे घरातच मंत्रि‍पदे ठेवली नाहीत.

बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी दिर्घकाळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. परंतु या दोघांच्या कार्यकाळात त्यांच्या कुटुंबातील अन्य कुणीही सदस्य मंत्रि‍पदावर नव्हता.

उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांनीही राज्यात तीनदा सरकार स्थापन केले. मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशात ३ वेळा मुख्यमंत्री होते. परंतु त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मुलगा अखिलेश यादवचा कधीही मंत्रिमंडळात समावेश केला नाही.

यूपी, बिहारमधील या दोन्ही प्रादेशिक पक्षात पुढील पिढी तेव्हा सक्रीय झाली जेव्हा त्यांच्या आधीची पीढी राजकारणात मागे पडली. मुलायम सिंह यादव यांच्या हयातीत २०१२ मध्ये अखिलेश यादव हे राज्याचे मुख्यमंत्री बनले होते.

बिहारमध्येही लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात जेलमध्ये गेल्यापासून ते जवळपास राजकारणातून दूर गेले होते. मात्र त्याच काळात लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव राजकारणात सक्रीय झाले. मागील काळात नितीश कुमार यांच्यासोबत ते सत्तेत होते. तेजस्वी यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले.