विरार येथे तरुणाने घरातच केला मोत्यांच्या शेतीचा प्रयाेग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 01:02 AM2021-03-03T01:02:51+5:302021-03-03T01:03:02+5:30

लाखोंची होते कमाई

In Virar, a young man practiced pearl farming at home | विरार येथे तरुणाने घरातच केला मोत्यांच्या शेतीचा प्रयाेग 

विरार येथे तरुणाने घरातच केला मोत्यांच्या शेतीचा प्रयाेग 

Next

सुनिल घरत
लोकमत न्यूज नेटवर्क 
पारोळ : इच्छा, जिद्द आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर माणूस काहीही करू शकतो. मग तो छोटामोठा व्यवसाय असो, भाजीची शेती असो वा मोत्यांची शेती असो. विरारमधील तरुणाने घरातच मोत्यांची शेती करून आज लाखो रुपयांची तो कमाई करत आहे. त्याने हा अनोखा व्यवसाय करून तरुणांपुढे नवा आदर्श ठेवला आहे. 
दागिन्यांची शोभा वाढवणारा मोती हा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. हे शिंपल्यातील मोती केवळ समुद्रातच मिळतात, असा बहुतांश जणांचा समज आहे. विरारमध्ये राहणाऱ्या स्वप्निल साळवी या तरुणाने चक्क आपल्या घरातच मोत्यांची शेती केली आहे. या मोत्यांचा भाव प्रती नग ५०० ते २५०० रुपये असून वर्षाकाठी १०-१२ लाखांचे उत्पन्न घेतले जात आहे.
विरारमध्ये राहणाऱ्या या तरुणाने गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शेतात काम करून काहीही हाती लागत नाही, अशी अनेकांची ओरड असते. पण या शेतीच्या प्रयोगने ती ओरड चुकीची ठरवली आहे. एका सामान्य कुटुंबातील स्वप्निल हा हॉटेल व्यवसायात होता. खूप मेहनत करूनही हवे ते उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्यानुसार चक्क घरातच मोत्यांची शेती करण्याचा अभिनव प्रयोग यशस्वीरीत्या प्रत्यक्षात आणला आहे. पारंपरिक गोल मोत्यांसह 'डिझायनर' मोत्यांची निर्मिती करून त्यांची ५०० रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या मोत्यांच्या शेतीतून स्वप्निलला वर्षांकाठी ८ ते १२ लाख उत्पन्न मिळत आहे. मोत्याची मागणी मार्केटमध्ये खूप जास्त आहे. विशेष म्हणजे ही शेती देशातील कोणत्याही भागात केली जाऊ शकते, अशी ही शेती आहे. सुरू करण्यापूर्वी ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. त्यानुसार स्वप्नीलने सीआयएफए म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाॅकल्चर नावाची एक संस्था आहे, जी शिंपल्याची शेती करण्याचे प्रशिक्षण देते. तेथे या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर दाेन वर्षे यावर संशाेधन केले व घरातच  मोत्यांची शेती केली. 
एखादा व्यवसाय मन लावून केला तर त्यात यश हे नक्की मिळते, हेच वाक्य स्वप्निलने सार्थ केले आहे. मोत्याच्या शेतीचे तंत्र हे स्वतः पुरते मर्यादित न ठेवता  इतर तरुण व शेतकऱ्यांनाही ताे या शेतीबाबत मार्गदर्शन करत आहे. तरुणांनीया क्षेत्राकडे वळावे कारण मोत्यांची शेती ही लाखमोलाची ठरू शकते, असे स्वप्निल याने सांगितले.

Web Title: In Virar, a young man practiced pearl farming at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.