Virar Building Collapse: विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत एकूण २४ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळला होता. इमारतीच्या मातीचा ढिगारा शेजारच्या चाळीवरही कोसळल्याने रहिवासी मलब्याखाली दबले गेले. त्यामुळे या घटनेची तीव्रता आणखी वाढली. ३० तासांपासून बचावकार्य सुरु असून एनडीआरएफच्या ५ व्या बटालियनच्या दोन तुकड्या, वसई-विरार महानगरपालिकेची तुकडी आणि स्थानिक पोलिस रात्रंदिवस मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहेत.
विरारच्या विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या अपार्टमेंटमध्ये ५० घरं आहेत. त्यापैकी १२ घरं कोसळली. तसेच इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली आणि मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल व एनडीआरएफ घटनास्थळी तात्काळ दाखल झालं होतं.
आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया नेवाळकर (३८), पार्वती सकपाळ (६०) दीपेश सोनी ( ४१), सचिन नेवाळकर (४०), हरीश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), कशिश पवन सहेनी (३५), शुभांगी पवन सहेनी (४०), गोविंद सिंग रावत (२८), दीपक सिंग बोहरा (२५) अशी मृतांची नावे आहेत.
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर रमाबाई अपार्टमेंट शेजारील ४ मजली इमारत व आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी विरार पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल गोपीनाथ साने आणि या अपघातासाठी जबाबदार असलेल्या जमीन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम ५२, ५३ आणि ५४ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १०५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.