VVMC Mayor Election 2026: वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत सत्ता कायम राखल्यानंतर आता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीतही बाजी मारली आहे. भाजपाने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार दिले होते. परंतु, बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील महापौरपदासाठीच्या निवडणुकीत विजयी झाले. तर, मार्शल लोपीस आणि कन्हैय्या भोईर उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत.
एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा पराभव झाला होता. मात्र, यातून सावरत बहुजन विकास आघाडीने वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार प्रचार व कार्यकर्त्यांच्या जोरावर या निवडणुकीत मुसंडी मारत पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. ११५ जागांसाठीच्या वसई-विरार मनपा निवडणुकीत बविआचे ७१ उमेदवार निवडून आले. भाजपाला ४३, काँग्रेसला १ आणि शिंदेसेनेला १ जागेवर विजय मिळाला. महापौर निवडीवरून बहुजन विकास आघाडी आणि भाजपा यांच्यात चुरस पाहायला मिळाली. महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीत भाजपाने उमेदवार दिले होते. तसेच या निवडणुकीत ऑपरेशन लोटस राबवले जाण्याबाबत शक्यता वर्तवली जात होती. परंतु, या सगळ्या शक्यतांना छेद देत बहुजन विकास आघाडीने वसई-विरार येथील आपले वर्चस्व कायम राखले आहे.
वसई-विरार येथे बहुजन विकास आघाडीच ‘ठाकूर’ हे पुन्हा एकदा सिद्ध
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे अजीव यशवंत पाटील यांची वसई-विरार महानगरपालिकेचे नवीन महापौर म्हणून निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत अजीव पाटील यांनी भाजपाच्या ॲड. दर्शना त्रिपाठी यांचा पराभव करत स्पष्ट बहुमत मिळवले. अजीव पाटील विजयी झाल्याची घोषणा झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महापौरपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात होते, परंतु मुख्य लढत बहुजन विकास आघाडी आणि भाजपा यांच्यात होती. भाजपाचे प्रफुल्ल साने आणि निषाद चोरघे हे पराभूत झाले.
हितेंद्र ठाकूर यांनी सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशकता जपली
उपमहापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मार्शल डॉमिनिक लोपीस आणि कन्हैया भोईर यांनी भाजपाचे नारायण मांजरेकर यांचा पराभव केला. हितेंद्र ठाकूर यांनी महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करताना वसई-विरारमधील सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशकता जपल्याचे दिसून येत आहे. अजीव पाटील आणि मार्शल लोपीस यांच्या रूपाने विविध समाजाला प्रतिनिधित्व देऊन आगामी निवडणुकांसाठी पक्षाने आपली पकड मजबूत केली आहे.
दरम्यान, भाजपा आमदार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीच्या बहुमताला आव्हान देत, महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु, सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने आपली पकड यशस्वीपणे कायम ठेवली आणि अजीव पाटील यांचा विजय सुनिश्चित केला. या निकालामुळे वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करूनही, भाजपाचे या भागात पाय रोवण्याचे प्रयत्न अपुरे पडले, असे म्हटले जात आहे.
Web Summary : Bahujan Vikas Aghadi retained power in Vasai-Virar, electing Ajeev Patil as Mayor. Despite BJP's efforts, the Aghadi secured victory, showcasing its continued dominance in the region and maintaining social harmony.
Web Summary : बहुजन विकास अघाड़ी ने वसई-विरार में सत्ता बरकरार रखी, आजीव पाटिल महापौर चुने गए। भाजपा के प्रयासों के बावजूद, अघाड़ी ने जीत हासिल की, जो क्षेत्र में इसके निरंतर प्रभुत्व को दर्शाती है।