उत्तनच्या महापालिका बेकायदा कचरा डम्पिंगला पुन्हा भीषण आग ; स्थानिकांच्या शिष्ट मंडळाने पोलिसात केली तक्रार
By धीरज परब | Updated: February 2, 2025 12:24 IST2025-02-02T12:23:48+5:302025-02-02T12:24:12+5:30
उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे.

उत्तनच्या महापालिका बेकायदा कचरा डम्पिंगला पुन्हा भीषण आग ; स्थानिकांच्या शिष्ट मंडळाने पोलिसात केली तक्रार
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील डम्पिंगला गेल्या वर्षीच्या मार्च नंतर पुन्हा १ फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषित धुराचे लोळ उठले असून स्थानिक नागरिक पुन्हा संताप व्यक्त करत आहेत. तर अग्निशमन दल आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रविवारी सकाळ पर्यंत आग धुमसत होती.
उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे. आधीच ह्या डम्पिंग मधून निघणाऱ्या लिचेट मुळे खालची शेती नापीक होऊन विहरीचे पाणी प्रदूषित झाले आहे. शिवाय परिसरात रोजची प्रचंड दुर्गंधी पसरते. तर ह्या जागेत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामे पालिकेच्या आशीर्वादाने फोफावली आहेत.
पूर्वीच्या सुमारे १० लाख टन साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगसाठी पालिकेने कोट्यवधींचा ठेका दिला. मात्र काम न केल्याने ठेका गेल्या वर्षी रद्द केला . तर रोज येणाऱ्या कचरा सपाटीकरण करण्यासाठीचा वेगळा ठेका मात्र एका माजी नगरसेवकाशी संबंधित एकाच ठेकेदारास गेल्या अनेक वर्षां पासून आंदण दिल्याची चर्चा आहे . डम्पिंग ला आग लागल्यास परिसरातून पाणी टँकरने पुरवण्याचा ठेका देखील परिसरातील एकाला दिला गेला.
डम्पिंग मध्ये रोज वर्गीकरण न केलेला कचरा गोळा होत आहे. आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत आल्याने नागरिकांनी तक्रारी व आंदोलनाचे इशारे दिले. गेल्या वर्षी मार्च मध्ये भीषण आग लागल्या नंतर लोकांनी संताप व्यक्त केला असता महापालिकेने पहिल्यांदा आगी प्रकरणी अनोळखी व्यक्ती वर उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या नंतर आग लागण्याचे प्रकार जवळपास बंद झाल्या मुळे स्थानिकांना दिलासा मिळाला होता.
परंतु शनिवार २ फेब्रुवारी रोजी बेकायदा डम्पिंग ला दुपारी पावणे ३ च्या सुमारास पुन्हा भीषण आग लागली आहे. डम्पिंग मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने फोफावण्यासह घातक असा धूर सर्वत्र पसरला आहे. पसरलेला विषारी धूर व रोजची दुर्गंधी यामुळे लोकांना श्वास घेणे अवघड झाले असून अनेकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.
अग्निशमन दलाचे ३ अधिकारी व ३४ जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ८ अग्निशमन बंब तैनात केले असून पाण्याचे ६ टँकर पाणी आणण्याचे कामी लावलेले आहेत. रात्री आग वाढली होती. रविवार सकाळ झाली तरी आग धुमसत होती.
सातत्याने आगी लागण्या मागे ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप पुन्हा होऊ लागला आहे . विशेष म्हणजे गेल्या वर्षी आग लावणाऱ्या अनोळखी विरुद्धचा दाखल गुन्हा अजून गुलदस्त्यात आहे.
आगीच्या घटने नंतर शनिवारी सायंकाळी संघर्ष समितीच्या वतीने फादर ऑस्कर मेंडोन्सा, विद्याधर रेवणकर, डेनिस नुनीस, हिलरी मेंडोन्सा व अन्य स्थानिकांनी मिळून उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी नाईक यांना भेटून तक्रार दिली. त्यात नेहमी प्रमाणे आग लागण्याच्या घटना घडत असून पोलिसांनी देखील ह्याचा तपास करावा अशी मागणी केली.
विद्याधर रेवणकर ( स्थानिक ग्रामस्थ ) - उत्तन डम्पिंग हा आमच्या निसर्गरम्य गावांना लागलेला शाप आहे. स्थानिकांनी सातत्याने तक्रारी , बैठका , आंदोलन व याचिका करून देखील महापालिकेला बेकायदा डम्पिंग आणि त्याला आगी लागण्याच्या प्रकारांना रोखण्यात अपयश आलेले आहे. आग आणि विषारी धुराचा त्रास व रोजची दुर्गंधी बंद होऊन नागरिकांची ह्यातून सुटका पालिकेने करावी .