उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या नाकर्तेपणावर मच्छीमार संतप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 18:05 IST2021-07-23T18:04:57+5:302021-07-23T18:05:34+5:30

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले आहे.

Uttan beach flooded with waste; Fishermen angry over municipal not working | उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या नाकर्तेपणावर मच्छीमार संतप्त 

उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या नाकर्तेपणावर मच्छीमार संतप्त 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड -  सार्वजनिक ठिकाणांची साफसफाईची जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेची असताना उत्तन समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात लाटांनी वाहून आलेल्या कचऱ्या कडे मात्र महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.  त्यामुळे समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले आहे. सध्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  जेणेकरून समुद्राच्या लाटांनी उत्तनच्या किनाऱ्यावर विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आला आहे.  किनाऱ्यावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कचरा किनाऱ्यावर तसाच पडून असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती मच्छिमार यांनी व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या कचऱ्यामुळे मच्छिमारांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा होत आहे. जाळी विणणे, बोट दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामां मध्ये व्यत्यय येत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. 

संपूर्ण शहराचा कचरा आणून उत्तन मध्ये पालिका टाकते. या कचऱ्याच्या बेकायदेशीर डंपिंग मुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. परंतु संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकणाऱ्या महापालिकेला उत्तन - पाली समुद्र किनारी साचलेले कचऱ्याचे ढीग मात्र साफ करावेसे वाटत नाही हे संतापजनक असल्याचे स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी म्हटले आहे. 

Web Title: Uttan beach flooded with waste; Fishermen angry over municipal not working