१८ व्या मजल्यावरून उडी मारून दोघांनी आयुष्य संपविले; चिठ्ठी न सापडल्याने गूढ वाढले; पदवीच्या शेवटच्या वर्षाला होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 07:24 IST2025-10-08T07:24:07+5:302025-10-08T07:24:36+5:30
विरारच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला.

१८ व्या मजल्यावरून उडी मारून दोघांनी आयुष्य संपविले; चिठ्ठी न सापडल्याने गूढ वाढले; पदवीच्या शेवटच्या वर्षाला होते
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : विरारच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या जवळ कुठल्याही प्रकारची चिठ्ठी आढळली नाही. त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे.
विरारच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेऊन पाहिले तर दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या दोन्ही तरुणांची ओळख पटली असून शाम घोरई (२०) आणि आदित्य रामसिंग (२१) अशी त्यांची नावे आहेत. ही दोन्ही मुले नालासोपारा पूर्वेकडील आचोळे परिसरात राहत होती. ते दोघे नालासोपारा पश्चिमेकडील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत होते. त्यांनी आत्महत्या का केली? आणि ते त्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत कसे आले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबियांना हत्येचा संशय
माझा मुलगा व शाम या दोघांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या असल्याचा आरोप आदित्यचे वडील राजसिंग यांनी आरोप केला आहे.
माझ्या मुलाला बोलावण्यासाठी दोघे आले होते व तिघे एकत्र गेले होते. पोलिसांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी आदित्यच्या वडिलांनी केली आहे.