वाड्यातील आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:00 IST2025-10-10T07:00:10+5:302025-10-10T07:00:19+5:30
मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित; आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट

वाड्यातील आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील आंबिस्ते येथील कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्री झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. देविदास परशुराम नवले (१५) व मनोज सीताराम वड (१४) विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघे अनुक्रमे दहावी व नववीत शिकत असून, मोखाडा तालुक्यातील बिवळपाडा व दापटी येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते, अधीक्षक राजू सावकारे यांना निलंबित केल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त भरत सावंत यांनी दिली.
आंबिस्ते येथे कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, सुमारे ४५० विद्यार्थी येथे निवासी शिक्षण घेत आहेत. बुधवारी रात्रीचे जेवण झाल्यावर सर्व विद्यार्थी झोपले. नेहमीप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षारक्षक शाळेच्या मागच्या बाजूला गस्त घालत असताना त्यांना झाडाला काहीतरी लटकत असल्याचे दिसले. ते झाडाच्या जवळ गेले असता दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकांनी तत्काळ मुख्याध्यापक, अधीक्षक व इतर शिक्षकांना आत्महत्येची माहिती दिली. काही वेळात पोलिसही तेथे दाखल झाले. पंचनामा करून विद्यार्थ्यांचे मृतदेह वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.
दोषींवर कारवाई हाेईल
जव्हार आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी डाॅ. अपूर्वा बासुर, पालघरचे अपर पोलिस अधीक्षक विनायक नरले व पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. खासदार डाॅ. हेमंत सवरा व भाजपचे नेते प्रकाश निकम यांनीही दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष जबाबदार
संस्थेचे आश्रमशाळेकडे दुर्लक्ष असून, या आश्रमशाळेला साधे तारेचे कंपाऊंड असून, तेही अनेक ठिकाणी तुटलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत येथून गेलेल्या रस्त्यावर असतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव हे जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा
दाखल करा.
गोविंद पाटील, उद्धवसेना