देव तारी त्याला कोण मारी?; दोन महिन्यांची चिमुकली सापडली कळंब येथील खाडीकिनारी झुडपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 06:11 IST2025-07-11T06:11:16+5:302025-07-11T06:11:34+5:30

हा परिसर तिन्ही पोलिस ठाण्यांच्या सीमांवर असल्याने कुठे गुन्हा दाखल करायचा हा प्रश्न होता. अखेर नालासोपारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

Two-month-old baby found in bushes on the shore of the creek in Kalamb nalasopara | देव तारी त्याला कोण मारी?; दोन महिन्यांची चिमुकली सापडली कळंब येथील खाडीकिनारी झुडपात

देव तारी त्याला कोण मारी?; दोन महिन्यांची चिमुकली सापडली कळंब येथील खाडीकिनारी झुडपात

नालासोपारा : खाडीकिनारी लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीला एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने किनाऱ्यावरील झुडपात जाऊन पाहिले असता तेथे गोणीत एक जिवंत बाळ रडताना त्याला दिसले. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने तिने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी त्या चिमुकलीला ताब्यात घेतले. ही घटना कळंब खाडीलगत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. नालासोपारा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा नोंदवायचा कुठे?
कळंब गावाच्या आधीची खाडी ‘कळंब खाडी’ म्हणून ओळखली जाते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास एका व्यक्तीला खाडीच्या परिसरातील कचरा आणि झुडपात प्लास्टिकच्या पिशवीत एक जिवंत बाळ दिसले. या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा, वसई आणि नालासोपारा पोलिस ठाण्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेऊन तत्काळ पालिकेच्या सोपारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.  बाळ दोन महिन्यांचे असावे, असे नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले. हा परिसर तिन्ही पोलिस ठाण्यांच्या सीमांवर असल्याने कुठे गुन्हा दाखल करायचा हा प्रश्न होता. अखेर नालासोपारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला, पण पडले झुडपात
अज्ञात आरोपीने बाळाला खाडीत फेकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते खाडीलगतच्या झुडूप आणि कचऱ्यात पडले. बाळ सुखरूप आहे. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी,’ याची प्रचिती आल्याचे स्थानिकांनी सांगितले.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१७ अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आम्ही परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. - विशाल वळवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नालासोपारा पोलिस ठाणे

Web Title: Two-month-old baby found in bushes on the shore of the creek in Kalamb nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.