दोन कावड यात्रेकरूंचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:51 IST2025-08-06T13:51:31+5:302025-08-06T13:51:47+5:30
श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर मंदिर अशी कावड यात्रा काढली होती. त्यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गटही सामील झाला होता.

दोन कावड यात्रेकरूंचा नदीत बुडून मृत्यू
नालासोपारा : श्रावणी सोमवार निमित्ताने कावड यात्रेसाठी गेलेल्या दोन तरुणांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू झाला. सचिन यादव (१८) व हिमांशू विश्वकर्मा (१८) अशी मृत तरुणांची नावे असून ते नालासोपारा येथील संतोषभवन परिसरात राहत होते.
श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर मंदिर अशी कावड यात्रा काढली होती. त्यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गटही सामील झाला होता. यात सचिन व हिमांशू यांचाही समावेश होता. याच प्रवासादरम्यान तुंगारेश्वर येथील नदीच्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी सचिन यादव हा पाण्यात पाय धुण्यासाठी उतरला आणि पाय घसरून नदीत पडला.
यावेळी हिमांशू विश्वकर्मा याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही बुडाला. दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तिसरा व्यक्तीही नदीत बुडत होता. मात्र, प्रसंगावधान राखून त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती पेल्हार पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पेल्हार गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यापूर्वीचा त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात
आली आहे.
तुंगारेश्वरला जाताना आंघोळीसाठी पाण्यात उतरू नका तसे आदेशही आम्ही काढलेत, पोलिस सतत याबाबत सूचना देत असतात. पण, असे हौशी लोक ऐकत नाहीत आणि दुर्घटना घडतात. दर्शनाला येताना नदीत आंघोळीसाठी उतरू नका.
जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पेल्हार पोलिस ठाणे
अभयारण्यात बंदी
बुडण्याच्या घटना लक्षात घेता तुंगारेश्वर अभयारण्यात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, श्रावण महिना सुरू असल्याने या येथील मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे ते या नदीत पाय धुणे, अंघोळ करण्यासाठी उतरतात.