आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपण्याचा प्रयत्न, गाण्यांतून दिला सामाजिक एकतेचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:10 AM2020-09-05T02:10:34+5:302020-09-05T02:10:51+5:30

आदिवासींची बोलीभाषा, गाणी, नृत्य, चित्रकला यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते या कलांमधून पाहायला मिळते. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करत आला

Trying to preserve the tribal culture, the message of social unity conveyed through the songs | आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपण्याचा प्रयत्न, गाण्यांतून दिला सामाजिक एकतेचा संदेश

आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपण्याचा प्रयत्न, गाण्यांतून दिला सामाजिक एकतेचा संदेश

Next

विक्रमगड - तालुक्यातील काही आदिवासी शिक्षकांनी एकत्र येत समाजमाध्यमाचा वापर करत आदिवासी समाजाची हरवत चाललेली सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या काळात आदिवासींचा सांस्कृतिक ठेवा हरवत असून मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या आलेला हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचावा म्हणून या शिक्षकांनी युट्युब चॅनलच्या माध्यमातून जल, जंगल अन धनतरी या गीताची निर्मिती केली आहे. हे गीत हजारो रसिकांनी पाहिले आहे.

आदिवासींची बोलीभाषा, गाणी, नृत्य, चित्रकला यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते या कलांमधून पाहायला मिळते. निसर्गपूजक असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करत आला असून निसर्गाशी असलेले त्यांचे भावबंध त्यांच्या कलांमधून आविष्कृत होत असतात. परंतु गेल्या काही वर्षात विविध माध्यमांतून झालेले सांस्कृतिक आक्रमण यामुळे आदिवासींचा मूळचा सांस्कृतिक वारसा हरवत चालल्याची भावना आदिवासी तरुणांमध्ये दिसत आहे. या भावनेतूनच तालुक्यातील प्रशांत नडगे, कमळाकर बिरारी, भगवान कुरकुटे, महेश भुसारे, मधुकर शेळके, दीपक मोर, सुनील लोखंडे आदी शिक्षकांनी एकत्र येत आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे म्हणून काही उपक्रम हाती घेण्याचे ठरवले. त्यातून रियल फ्रेंड युट्यूब चॅनलची संकल्पना पुढे आली. शिक्षकांच्या या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नाना अहिरे, विजय भोये, किशोर भोये, दशरथ दांगटे यांचे पाठबळ मिळाल्याने जल, जंगल अन धनतरी या गाण्याची निर्मिती करणे शक्य झाल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. आदिवासींचा सांस्कृतिक वारसा टिकवणे ही तरुणांची जबाबदारी असल्याचे मानून या शिक्षकांनी केलेला हा प्रयत्न तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे.

विविध गाण्यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील विद्यार्र्थ्यांना शालेय अभ्यासक्रम अधिक सोप्या भाषेत कसा शिकवता येईल, असा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे.
- सुनील लोखंडे, प्राथमिक शिक्षक, विक्रमगड

Web Title: Trying to preserve the tribal culture, the message of social unity conveyed through the songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.