वाढवणची युवाशक्ती विचलित करण्याचा डाव. खासदारांच्या नावाने स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:22 IST2020-12-06T00:22:41+5:302020-12-06T00:22:51+5:30
Vasai Virar News : जिल्ह्यात तरुण मुलांमध्ये क्रिकेटची मोठी क्रेझ असून गावागावांत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमेचे आमिष दाखवले जाते.

वाढवणची युवाशक्ती विचलित करण्याचा डाव. खासदारांच्या नावाने स्पर्धा
- हितेन नाईक
पालघर - वाढवण बंदराविरोधात तरुणवर्ग आक्रमक झाला असताना ‘युवाशक्ती’ कमजोर करण्यासाठी आणि त्यांचे वाढवणवरील चित्त विचलित करण्यासाठी चिंचणी येथील गावदेवी मंदिर मैदानावर खासदार चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सामन्यांमध्ये कुणीही सहभाग न घेण्याच्या आवाहनाला किनारपट्टीवरील तरुणांकडून प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात प्रशासन मोठी गर्दी होणाऱ्या स्पर्धांना परवानगी कशी देते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात तरुण मुलांमध्ये क्रिकेटची मोठी क्रेझ असून गावागावांत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमेचे आमिष दाखवले जाते. डहाणू तालुक्यातील सीआरडी ग्रुप आयोजित खासदार चषक, क्रिकेटचा महासंग्राम २०२० चे आयोजन २५ ते २७ डिसेंबरदरम्यान करण्यात आले असून प्रथम पारितोषिक २ लाख, द्वितीय १ लाख तर तृतीय ५० हजार रुपये. या पारितोषिकांसह मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना मोठ्या रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथमच आयोजित या क्रिकेट सामन्याच्या जाहिरात फलकावर खासदार राजेंद्र गावित यांचे छायाचित्र आहे.
दरम्यान, वाढवण बंदराविरोधात वाढवण आणि परिसरातील काही गावांनी सुरू केलेल्या आंदोलनाने आता व्यापक रूप घेतले आहे. डहाणू ते मुंबई-कुलाबापर्यंतच्या किनारपट्टीवरील गावागावांतून लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत. वाढवणसंदर्भात सर्वेक्षण अथवा कुठल्याही गोष्टीला या भागात स्थानिक ग्रामस्थ परवानगी देत नसून त्यांच्या कडव्या विरोधापुढे पोलीस बंदोबस्ताचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी कुठल्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होणार नाही, यासाठी युवाशक्ती, महिला, लहान मुले ‘करो या मरो’च्या भूमिकेत केंद्र-राज्य शासनाच्या विरोधात उभी राहिली आहेत. त्यांची एकजूट आणि आक्रमकतेमुळे कुणाचीही डाळ शिजत नसल्याने या युवाशक्तीच्या एकजुटीची ताकद त्यांच्या आवडीच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून कमी करून त्यांचे चित्त विचलित करण्याचा प्रयत्न लाखोच्या बक्षिसांचे आमिष दाखवून करण्यात येत असल्याचा आरोप सोशल मीडियावरून करण्यात येऊ लागला आहे.
आमचा वाढवण बंदराला विरोध असल्याचे बॅनर आम्ही नव्याने बनवले आहेत. स्पर्धेसाठी मैदानाच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली आहे.
- अमित मिश्रा, आयोजक