आदिवासींच्या झोपडीत अंधार: डहाणूच्या रॉकेल कोट्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:21 IST2017-08-24T03:21:20+5:302017-08-24T03:21:26+5:30
पालघर जिल्हापुरवठा विभागाच्या मनमानी कारभारामुळे ७० टक्के आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्याच्या रॉकेल कोट्यात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने कपात केली जात असल्याने द-या खो-यांत राहणा-या आदिवासींच्या झोपडीतील चूल पेटेनाशी झाली आहे.

आदिवासींच्या झोपडीत अंधार: डहाणूच्या रॉकेल कोट्यात घट
- शौकत शेख।
डहाणू : पालघर जिल्हापुरवठा विभागाच्या मनमानी कारभारामुळे ७० टक्के आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्याच्या रॉकेल कोट्यात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने कपात केली जात असल्याने द-या खो-यांत राहणा-या आदिवासींच्या झोपडीतील चूल पेटेनाशी झाली आहे.
आॅगस्ट महिन्याची १८ तारीख झाली तरी अद्याप तालुक्याला रॉकेलचा पुरवठा झालेला नाही. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात ७२ हजार शिधापत्रिकाधारक असून २००२ च्या जनगणनेनुसार ४२ हजार कुटुंबे दारिद्रय रेषेखालचे जीवन जगत आहे. येथील बहुसंख्य आदिवासी व गोरगरीब लोकांकडे गॅस कनेक्शन नसल्याने स्वयंपाक तसेच झोपडीत दिवा पेटविण्यासाठी त्यांना फक्त रॉकेलचाच आधार असतो. डहाणू तालुक्याला दरमहा शासनाकडून १३ टँकर (१ लाख ५६ हजार लिटर रॉकेल) दिले जाते. परंतु गेल्या महिन्यात ३६ हजार लिटर रॉकेलची कपात करण्यात आली. तर माहे जुलै महिन्यात २४ हजार लिटर्स रॉकेलची कपात करण्यात आल्याने अनेक गाव, खेडेपाडे रॉकेलपासून वंचित राहिले आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्याला मिळणाºया रॉकेल साठयाचे योग्य नियोजन होत नसल्याचा फटका दर महिन्याला डहाणू तालुक्याला बसतो आहे.
दरम्यान डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद हायवेच्या पलीकडील शंभर टक्के लोकवस्ती असलेल्या आदिवासी गाव, गावपाडयात कायमस्वरूपी रोजगार नसतो. पावसाळयात रोजगारासाठी कुठेच बाहेर पडता येत नसल्याने या आदिवासींना स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ, गहू, तेल, साखर, रॉकेलचा मोठा आधार असतो. परंतु दिवसेंदिवस अपुºया मिळणाºया धान्यामुळे दारिद्रयरेषेखालील गरीबांवर बाजारातून महागडे धान्य खरेदी करण्याची वेळ आली आहे. तर हजारो आदिवासी रेशनकार्ड धारकांना रॉकेल ही पुरेशाप्रमाणात मिळत नसल्याने त्यांना पेट्रोलपंपावरून महागडे डिझेल खरेदी करण्याची वेळ आली आहे.
देशात दिवसेंदिवस वाढणाºया महागाईमुळे गोर गरीब व सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठिण होत असतांनाच गेल्या वर्षभरात रॉकेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने रास्त भाव दुकानातून मिळणारे रॉकेल हळूहळू बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यापूर्वी गॅस कनेक्शन नसलेल्या रेशनकार्ड धारकांना पंधारा लिटर रॉकेल दिले जात होते. परंतु गेल्या वर्षभरापासून केवळ रेशनकार्ड धारकांना चार लिटर केरोसीन मिळत असल्याने प्रचंड भारनियमनात दिवा पेटविण्यासाठी नागरिकांना पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करण्याची वेळ आली आहे.
७ रुपयांनी महाग
सन २०१६ च्या जून महिन्यात रॉकेलचे भाव १५रु. १८ पैसे होते. तेव्हा पासून प्रत्येक पंधरवडयात केंद्राने २६ पैशांनी रॉकेलच्या भावात वाढ केल्याने आज २२रु.५८ पैसे लिटर दराने रॉकेल खरेदी करण्याची वेळ आदिवासींवर आली आहे. म्हणजेच वर्षभरात रॉकेल सात रूपयांनी महागले आहे.