चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 05:35 IST2025-09-20T05:34:37+5:302025-09-20T05:35:27+5:30
इमारतीवरून पडल्याने रियान गंभीर जखमी झाला. घरच्यांनी तत्काळ त्याला घेऊन नायगावचे गॅलेक्सी रुग्णालय गाठले. डाॅक्टरांनी तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला.

चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
मंगेश कराळे
नालासोपारा : खरं तर १६ महिन्यांचा चिमुरडा रियान मुंबईतला, पण आजीकडे पेल्हार येथे राहायला आला होता. खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला, दैव बलवत्तर म्हणून वाचला खरा, पण मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडी त्या बाळाचा जीव घेणारी ठरली.
इमारतीवरून पडल्याने रियान गंभीर जखमी झाला. घरच्यांनी तत्काळ त्याला घेऊन नायगावचे गॅलेक्सी रुग्णालय गाठले. डाॅक्टरांनी तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार घरच्यांनी गुरुवारी दुपारी रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी मुंबईतील हाॅस्पिटलची वाट धरली. गंभीर जखमी असला तरी बाळाची काहीशी हालचाल सुरू होती. मुंबईत पोहोचताच उपचार करून आपले बाळ वाचेल, अशा आशेने त्यांनी देवाचा धावा सुरू केला. पण सुमारे पाच तास रुग्णवाहिका कोंडीत अडकली आणि बाळाची हालचाल हळूहळू थांबू लागली. अखेर घरच्यांनी जवळपास असलेले ससूनवघर गावातील रुग्णालय गाठले, पण त्यापूर्वीच बाळाचे प्राणपखेरू उडून गेले होते.
गुरुवारी दुपारी एक-दोनच्या दरम्यान पेल्हार रुग्णवाहिका निघाली, पण महामार्गावरील वाहतूक कोंडीत ती अडकून पडली. रुग्णवाहिकेला पुढेही जाता येईना, ना मागे, अशी विचित्र स्थिती झाली. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, रुग्णवाहिका मात्र पुढे जात नव्हती.
झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. वाहतूक कोंडीमुळे झाले, असे म्हणता येणार नाही. वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी व मुख्य सचिवांना कळविले आहे.
स्नेहा दुबे पंडित, आमदार, वसई