महसूल कर्मचाऱ्यांची ३५२ पदे जिल्ह्यात रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:24 IST2019-08-01T00:24:35+5:302019-08-01T00:24:39+5:30
पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे.

महसूल कर्मचाऱ्यांची ३५२ पदे जिल्ह्यात रिक्त
मनोर : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही महसूल कर्मचाऱ्यांची तब्बल ३५२ पदे रिक्त आहेत. मात्र, ही पदे भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ही पदे भरण्याची पदे भरण्यासाठी मागणी कोणी केलीच नाही.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी महसूल विभागाचे ६५३ मनुष्यबळ मंजूर करण्यात आले. मात्र त्यापैकी पन्नास टक्के अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर कामाचा अधिक ताण असल्याने त्यांची मानसिकता स्थिर नाही. एका तलाठ्याला दोन ते तीन सजामध्ये काम करावे लागते.
पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा अशा आठ तालुक्यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार १६, अव्वल कारकून ५९, लिपिक ३९, तलाठी ६७, मंडळ अधिकारी २३, शिपाई ५६, कोतवाल ८४, वाहन चालक १४, अशी एकूण ३५२ पदे रिक्त आहेत. फक्त ३०३ अधिकारी आणि इतर कर्मचाºयांवर पालघर जिल्ह्याचे शासकीय काम मंद गतीने सुरू आहे. त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री तसेच जिल्ह्यात असलेल्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाकडे रिक्त पदे भरण्यासाठी कधीही मागणी केली नाही. संजय गांधी योजनेचे काम देखील पूर्ण ठप्प आहे.
मनुष्यबळाचे प्रमाण वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जनतेची सर्व शासकीय कामाबाबत दखल घेण्यात येईल. यापुढे प्रत्येक सोमवारी मिटिंग वगैरे घेणार नाही त्या दिवशी नागरिकांबरोबर राहून त्यांची कामे मार्गी लावण्याचे काम करणार आहे.
- कैलास शिंदे,
जिल्हाधिकारी, पालघर