विरारमध्ये ट्रकखाली सापडून तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 12:56 IST2023-04-14T12:56:06+5:302023-04-14T12:56:21+5:30
ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटक रस्त्यावरील घटना

विरारमध्ये ट्रकखाली सापडून तिघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): विरारच्या ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटक रस्त्यावर एक हायवा ट्रक रस्त्यातच उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक खाली सापडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारिंगी फाटकापासून ग्लोबल सिटीच्या दिशेने हा ट्रक जात होता. मात्र भर वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचविण्यात ट्रकचे नियंत्रण सुटले व ट्रक थेट रस्त्याकडेला उलटला. या ट्रक खाली तिघे जण सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक व अग्निशमन पथकाच्या जवानांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले आहे. हा ट्रक मालाने भरलेला असल्याने तीन क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक आता बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.