नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:48 IST2025-05-04T06:47:57+5:302025-05-04T06:48:05+5:30

वाडा तालुक्यात १४ गाव-पाड्यांत टँकरने पाणी : विहिरींवर भांड्यांची रांग

They provided tap connections, but not a single drop of water was available... | नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...

नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...

वसंत भोईर/अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांत पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. पाणीटंचाई पाहता पंतप्रधानांच्या स्वप्नातील ‘हर घर नल से जल’ या योजनेसह अन्यही पाणीपुरवठा योजनांची लाखो रुपये खर्च करून वाड्यात कामे झाली. काही गावांत कामे अर्धवट, तर काही गावांत टाक्या उभारल्या आहेत. नळजोडण्याही दिल्या; मात्र या नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागते. अनेकांना विहिरीवर हंडाभर पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या तालुक्यातील १४ गाव-पाड्यांत तीव्र पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील सागमाळ, टोकरेपाडा, जांभूळपाडा, घोडसाखरे, दिवेपाडा, फणसपाडा, गवळीपाडा, तरसेपाडा, तसेच तुसे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीपाडा, फणसपाडा, पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळास, मुसारणे, बालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चौरेपाडा, तर उमरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदीचापाडा या गावपाड्यांत भीषण पाणीटंचाई आहे. येथील नागरिकांनाही टँकरच्या भरवशावर अवलंबून राहावे लागत आहे. 

निधीचा उपयोग काय? 
वाडा तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांत जलजीवन योजनेंतर्गत  पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. या योजनांचा कालावधी संपला, तरी योजना पूर्ण झालेल्या नाहीत. 
काही योजनांची कामे झाली; मात्र ती निकृष्ट दर्जाची झाली. पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो खर्चूनही जर नशिबी पाणीटंचाईच असेल, तर खर्च झालेल्या निधीचा उपयोग काय? अशा शब्दांत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 
नळजोडण्या दाखवण्यासाठी जोडल्या; पण त्या नळात पाणी नाही. माती जाऊन बसली आहे. पावसात खड्ड्यातील घाण पाणी नळाला येण्याची शक्यता असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

वनविभागाकडे प्रस्ताव प्रलंबित
ओगदा ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यात ‘जलजीवन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. वनविभागाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. योजना अपूर्ण असलेल्या गाव-पाड्यांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे, अशी माहिती वाडा पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. डी. जाधव यांनी दिली. 

जलजीवन योजनेंतर्गत वाडा तालुक्यात करोडोंचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 
सागर पाटील, ग्रामस्थ

Web Title: They provided tap connections, but not a single drop of water was available...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी