वळीवाच्या पावसाने जव्हारवासियांची दाणादाण, घरांसह जि.प शाळांचीही छपरे उडाली, फळबागांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 19:31 IST2024-05-16T19:31:06+5:302024-05-16T19:31:14+5:30
सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

वळीवाच्या पावसाने जव्हारवासियांची दाणादाण, घरांसह जि.प शाळांचीही छपरे उडाली, फळबागांचे नुकसान
जव्हार : सोमवारी तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या वळीवाच्या पावसाने येथील नागरिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे करण्याची मागणी होत असतानाच बुधवारी सायंकाळी पुन्हा या पावसाने जव्हार तालुक्याला झाेडपले. बुधवारी झालेल्या पावसामुळे येथील जनजीवनाची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. जव्हार तालुक्यात जवळपास ५०० हून अधिक घरांची छपरे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडलेत. जि.प. शाळांवरील छप्परे उडून आतील साहित्याचे नुकसान झाले. तर अनेक झाडे उन्मळून पडल्याने फळबागायतदार, शेतकरी संकटात सापडले आहेत.
सोमवारी अन्य तालुक्यांप्रमाणे जव्हारमध्येही जोरदार वारा-पाऊस झाला. त्यातील नुकसानीचे योग्य माहिती घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर तालुक्यात बुधवारी सायंकाळी पुन्हा वळीवाचा पाऊस झाला. येथील वाळवंडा, वरचा कशीवली येथील जवळपास सर्वच घरांचे पत्रे उडून गावातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. तर अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक मार्ग बंद पडले होते. तर काही झाडं घरावर पडलीत. त्याचबरोबर तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांचीही छप्परं उडून शाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वाळवंडा, कशिवली, खडकीपाडा, साखरे, शिरोशी, धानोशी, रामखिंड, विनवळ, जामसर, न्याहाळे, पाथर्डी, झाप, आपटाळे, या गावांमध्ये बुधवारच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने पंचनामे करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली.
सुदैवाने या वादळी पावसाने कुठलीही जीवित हानी अथवा प्राणहानी झालेली नाही. चार ते पाच जणांना किरकोळ मार लागला आहे. नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, दोन ते तीन दिवसांत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.
-लता धोत्रे, तहसीलदार,जव्हार