रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:07 IST2025-11-25T11:06:01+5:302025-11-25T11:07:27+5:30
Mokhada: एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडल्याने त्या प्रसूत महिलेला बाळ व कुटुंबीयांसह दोन किमीची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना मोखाड्यात घडली आहे.

रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
- रवींद्र साळवे
मोखाडा - एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडल्याने त्या प्रसूत महिलेला बाळ व कुटुंबीयांसह दोन किमीची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना मोखाड्यात घडली आहे.
मोखाडा तालुक्यातील आमले येथील प्रसूत महिला सविता बारात (सासरचे नाव सविता मनोज बांबरे) हिला बुधवार १९ नोव्हेंबर रोजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल केले, तिची प्रसूती सुखरूप झाली. रविवार २४ नोव्हेंबर रोजी तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका चालकाने त्यांना गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर उतरवून रुग्णवाहिका निघून गेली. प्रसूत महिला सविता बारात हिच्यासोबत आई व सासू होत्या. त्यांना व प्रसूत महिलेला बाळाला घेऊन दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.
घटनेबद्दल संताप;कारवाईची मागणी
या सर्व घटनेचा तिच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे. आम्हाला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडले. यामुळे आम्हाला दोन किमी पायपीट करावी लागल्याचे प्रसूत महिलेचे पती मनोज बांबरे यांनी सांगितले.
त्या प्रसूत महिलेच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला खोडाळापर्यंत सोडा तिथून पीएसीच्या गाडीतून आम्ही जाऊ असे सांगितले; परंतु तिथे गेल्यावर पीएसीचे वाहन नसल्याने आम्हाला आमले फाट्यापर्यंत सोडा असे सांगितले व त्यांना आमले फाट्यावर सोडले. तसेच वाहनचालक बोलले तुम्हाला घरापर्यंत सोडू का? तर कुटुंबीयांनी सांगितले की, रस्ता लहान असल्याने गाडीला वळण घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना आमले फाट्यापर्यंत त्यांच्या सांगण्यावरून सोडण्यात आले.
- संजय कावळे, वैद्यकीय अधीक्षक, कुटीर रुग्णालय जव्हार.