रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:04 IST2025-07-04T08:03:41+5:302025-07-04T08:04:05+5:30
पूल नसल्याने होत आहेत ग्रामस्थांचे हाल

रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
वाडा : तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रायकरपाडा हे २० घरांचे गाव आहे. मात्र ऊन असो की पाऊस, गावातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी दररोज स्वत:च तराफा चालवत वैतरणा नदीचा अर्ध्या तासाचा प्रवास करून जातात. त्यांचा हा शिक्षणासाठीचा प्रवास पावसाळ्यात जीवघेणा ठरत आहे.
रायकरपाडा या गावातील १५ विद्यार्थी सोनाळा हायस्कूल येथे, २ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा कापरी, तर एक विद्यार्थी वाडा कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत आहे. मात्र, या पाड्यावरील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी नदीवर कोणताही पूल नाही तर इतर गावपाड्यांमार्गे असलेला कच्चा रस्ता हा १० ते १२ किलोमीटर वळणाचा ठरतो. त्यामुळे येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांना ही नदी पार करण्याशिवाय पर्याय नसतो.
पूल होऊन आमची गैरसोय दूर व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही आमची कोणी दखल घेत नाही. त्यामुळे आम्हाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे.
विनोद हाडळ, ग्रामस्थ
गावात जाण्यासाठी वैतरणा नदी पार करून जावे लागते. त्यामुळे तेथे पूल होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, या गावातील विद्यार्थ्यांची शाळेच्या ठिकाणी सोनाळे येथील वसतिगृहात, तर मुलींची कंळभे येथील मुलींच्या वसतिगृहात व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
कुंदन भोईर, ग्रामपंचायत अधिकारी
गर्भवती महिला, लहान मुले यांचीही गैरसोय
एरवी नदीच्या पात्रात पाणी कमी असते. मात्र, पावसाळ्यात वैतरणा नदी रुद्रावतार धारण करते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तराफ्यावरूनच प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबरच गर्भवती महिला, लहान मुले, रुग्ण यांचीही गैरसोय होत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.