विरार-विक्रमगडमध्ये पावसाचा शिडकावा, सततच्या 'बत्तीगुल'ने नागरिक घामाघूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 23:41 IST2021-04-14T23:32:53+5:302021-04-14T23:41:42+5:30
Virar-Vikramgad : लॉकडाऊननिमित्तची संचारबंदी आणि वाढत्या उन्हाचा मारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मंगळवारी मध्यरात्री अनपेक्षित पाऊस झाला.

विरार-विक्रमगडमध्ये पावसाचा शिडकावा, सततच्या 'बत्तीगुल'ने नागरिक घामाघूम
विरार/विक्रमगड : जिल्ह्यात विरार, विक्रमगडसह काही भागांत मंगळवारी मध्यरात्री पावसाचा शिडकावा झाला. या पावसाचा सुखद अनुभव घेणार तोच यादरम्यान दोन-तीन वेळा 'बत्तीगुल' झाल्याने विरारवासीय घामाघूम झाले. दुसरीकडे एप्रिल महिन्याला सुरुवात होताच उष्णतेतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
लॉकडाऊननिमित्तची संचारबंदी आणि वाढत्या उन्हाचा मारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मंगळवारी मध्यरात्री अनपेक्षित पाऊस झाला. या पावसाचा अंथरुणावरूनच सुखद अनुभव विरारवासी घेणार तोच दोन-तीन वेळा 'बत्तीगुल' झाल्याने अंथरुणावरच नागरिक घामाने भिजले. परिणामी, सकाळी तीन-साडेतीनच्या सुमारास हवेसाठी घरादाराच्या खिडक्या उघडताना नागरिक दिसत होते. तास-अर्ध्या तासाने वीज आली तरी १५ मिनिटे झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने गर्मीत अधिकच भर पडली होती. पावसाचा परिणाम म्हणून बुधवारी सकाळीदेखील उष्मा अधिक जाणवत होता. विशेष म्हणजे बुधवारी संध्याकाळपासून पुन्हा एकदा सरकारने 'लॉकडाऊन'साठी कडक निर्बंध लावले असल्याने महावितरणकडून असाच 'वीज खेळखंडोबा' झाल्यास मागील वर्षीसारखा नागरिकांच्या संतापाचा पारा या वर्षीदेखील कायम राहू शकतो.
दरम्यान, विक्रमगड तालुक्यात मंगळवारी रात्री आणि पहाटे पावसाने रिपरिप सुरू केली. पुन्हा पहाटे पावसाच्या सर आली तसेच सकाळी ढगाळ वातावरण असल्याने आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कारण आंबा झाडावर सध्या कैऱ्या होऊ लागल्याने ढगाळ वातावरण व पावसामुळे या कैऱ्यांवर परिणाम होणार आहे.
निसर्गाचा लहरीपणा
दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी पाऊस व त्यामुळे वातावणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असून गेल्या काही दिवसांत लांबलेले थंडीचे प्रमाण याचा परिणाम मनुष्यावरच नाही तर निसर्गावरसुद्धा होऊ लागला आहे.