नेटिझन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:13 IST2019-11-25T01:11:39+5:302019-11-25T01:13:53+5:30
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची खलबते अंतिम टप्प्यात आली असतानाच शनिवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला.

नेटिझन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे तीव्र पडसाद
- सुनील घरत
पारोळ : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्तास्थापनेची खलबते अंतिम टप्प्यात आली असतानाच शनिवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राजभवनात सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने मोठा राजकीय भूकंप घडून सर्व राजकीय गणिते चुकीची ठरवत सत्ता स्थापन केली. या राजकीय भूकंपाचे हादरे मात्र दिवसभर सोशल मीडियावर बसत होते. शनिवार, रविवार सोशल मीडियावर मेसेजचा पूर आल्याने दूरचित्रवाणीवरून त्याच ब्रेकिंग पाहून वैतागलेल्या नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यात महाविकासआघाडी काही अंशी यशस्वी होण्याची चिन्हे असतानाच सकाळी - सकाळीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची बातमी येऊन थडकली आणि अनेकांची झोप उडाली. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या.
एकीकडे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच समर्थकांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे राष्ट्रवादीबरोबर घरोबा केल्याने ‘पारदर्शक भ्रष्टाचार’ असे म्हणत नेटिझन्सनी नाराजीचा सूरही आळवला. ‘शपथविधी होता की, दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी - सकाळी आटोपला’, अशा शब्दात या घटनेची खिल्ली उडविण्यात आली. ‘भंडारा चल रहा था, अंदर गए तो हलवा खत्म, बहार आए तो चप्पल गायब’, ‘चिटिंग करताय तू...बेचारा सो रहा था मैं, सपने देख रहा थे मैं’ अशा विविध प्रकारच्या पोस्टही टाकण्यात आल्या. तर, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असे म्हणणाºया फडणवीसांना, ...पण एवढ्या सकाळी याल असं वाटलं नव्हतं’, असा खोचक टोलाही लगावला.
‘पळून जाऊन राजभवनात दोघांचे लग्न’ अशा आशयाखाली नवरदेव देवेंद्र आणि वधू अजितदादा तर राज्यपाल भटजी अशा कल्पकतेच्या पोस्टमधून अनेकांचे मनोरंजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांकडे हात दाखवत म्हणत आहेत ‘हे कधी काय करेल काही सांगता येत नाही’ हे सूचक विधानही खूप काही सांगून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात शेती प्रश्नांवर जी एक तास चर्चा झाली, त्याचंच हे पीक आज आलेले आहे’ अशी कॉमेंट करण्यातही नेटिझन्स मागे नव्हते.
तर माध्यमांना मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांनुसार हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की, अखेर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांनाही माहिती नव्हती असा मेसेज करून माध्यमांनाही लक्ष्य
करण्यात आले.
या राजकीय भूकंपाचे हादरे मात्र दिवसभर सोशल मीडियावर बसत होते. शनिवार, रविवार सोशल मीडियावर मेसेजचा पूर आल्याने दूरचित्रवाणीवरून त्याच ब्रेकिंग पाहून वैतागलेल्या नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या.