Shiv Sena opposes change in candidate | उमेदवारी बदलांना शिवसैनिकांकडून होणार विरोध?
उमेदवारी बदलांना शिवसैनिकांकडून होणार विरोध?

हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी बदलण्याचे संकेत मिळत असून पालघरला अमित घोडा यांच्या जागी श्रीनिवास वनगा तर बोईसरला बविआचे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश होत त्यांना बोईसरची उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही बदलांना शिवसैनिक,पदाधिकाऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


चिंतामण वनगांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला श्रीनिवास यांना उद्धव ठाकरे यांनी सेनेकडून उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा डाव रचला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगले जनमत असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपची उमेदवारी देत जागाही जिंकून घेतली. त्यानंतरच्या २०१८ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभेची जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याने श्रीनिवासलाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपमधून राजेंद्र गावितांना सेनेत प्रवेश देत जागाही जिंकून घेतली. त्यामुळे पुन्हा श्रीनिवास यांना हात चोळत बसावे लागले होते.


उद्धव यांनी बोलताना श्रीनिवासवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे जाहीर वक्तव्य केल्याने त्याच्या पुनर्वसनाचा पेच उद्धव यांच्यापुढे असून जनमानसात आपल्यावरचा विश्वास ढळू न देता श्रीनिवासचे योग्य पुनर्वसन करावे लागणार आहे.त्यामुळे पालघर विधानसभेचे तिकीट श्रीनिवासला देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिक,पदाधिकाऱ्यांचा विरोध होत आहे.श्रीनिवास यांना पालघरची उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहू, मात्र मतदारसंघात प्रचाराचे कुठलेच काम न करता शांत राहण्याची भूमिका स्वीकारू असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ पदाधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.


बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जगदीश धोडी यांचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांच्यासह अनेकांचा विरोध आहे. या वादामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वास वळवी यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मी एक शिवसैनिक असून पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविल्यास आपण लढण्यास तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. त्यांचे शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. तर दुसºया बाजूने बहुजन विकास आघाडी पक्षाच्या जोरावर दोन वेळा निवडून आलेले आमदार तरे यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेकडून बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न चालविले आहेत. परंतु आपल्या कारकिर्दीत आपल्या जवळच्या लोकांना कामाचे कंत्राट देणे, आपल्या आमदारकीच्या जोरावर विशिष्ट लोकांचीच कामे करून देणे, महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करण्याविरोधातील आंदोलनात त्यांचा सहभाग नसणे, सूर्याचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी व जनतेला पिण्यासाठी मिळावे या आंदोलनातही ते कुठे दिसलेच नाहीत.

तरे अनेक महिन्यांपासून सेनेच्या संपर्कात
बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार म्हणून आ. तरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जनमतावर विशेष प्रभाव निर्माण केलेला नसल्याने त्यांना यावर्षी बविआकडून उमेदवारी नाकारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे तरे शिवसेनेच्या संपर्कात होते.

बविआला झटके बसण्याची चिन्हे
उद्या मुंबईत त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती असून या विधानसभा निवडणुकीत बविआ पक्षाला अनेक झटके बसण्याची शक्यता असून दुसरीकडे माजी राज्यमंत्री व बविआच्या पालघर विधानसभेच्या उमेदवार मनीषा निमकर याही अन्य पक्षांच्या पर्यायाची चाचपणी करत असल्याने पालघर लोकसभेच्या कार्यक्षेत्रात येत्या आठवडाभरात पक्षांतराची मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Shiv Sena opposes change in candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.