ग्रामीण रुग्णालयाची सेप्टी टॅँक तुबली, रोगराई
By Admin | Updated: November 9, 2016 03:33 IST2016-11-09T03:33:08+5:302016-11-09T03:33:08+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयाची आवारातच शौचालयाच्या तुंबलेली सेप्टी टॅँक भरून वाहू लागल्याने तिच्या डबक्यात रोज हजारो डासांची उप्तती होत असल्याने रुग्णांचे

ग्रामीण रुग्णालयाची सेप्टी टॅँक तुबली, रोगराई
पंकज राऊत, बोईसर
येथील ग्रामीण रुग्णालयाची आवारातच शौचालयाच्या तुंबलेली सेप्टी टॅँक भरून वाहू लागल्याने तिच्या डबक्यात रोज हजारो डासांची उप्तती होत असल्याने रुग्णांचे व संपूर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधी व डासांमुळे सगळे हैराण झालेले असले तरी आरोग्य खाते आणि स्थानिक प्रशासन मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहेत.
ही टाकी साफ करण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची, रुग्णालयाची की, पंचायतीची असा तिढा निर्माण झाला आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन सुमारे दोनशे बाह्य रुग्ण औषधोपचाराकरिता येत असतात तर त्यापैकी काही गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना दाखल ही करून घेण्यात येते त्याच प्रमाणे प्रसूतीसाठी ही महिला मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बोईसरसह परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस गावां-पाड्यांतून नागरी वसाहतींतून गरीब तसेच आदिवासी त्याचप्रमाणे तारापूर एम्.आय्.डी.सी.मधील कामगारवर्ग व त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणात उपचाराकरीता येत असतात.
सध्या डेंग्यूसह अनेक साथींच्या आजारांची सर्वत्र लागण सुरु असून त्यामध्ये रुग्ण दगावत आहेत तर डेंग्यूच्याबाबत भयंकर भीती आहे. शासकीय यंत्रणाच म्हणते स्वच्छता राखा, घरात व आजुबाजुला पाणी व डबके साचू देऊ नका त्या मध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन साथीचे आजार पसरतील परंतु याच शासनाच्या अखत्यारितील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात नेमके त्याविरुद्ध वातावरण आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील या मैल्याच्या डबक्यामध्ये डासांच्या झुंडीच्या झुंडी सर्वत्र घोंघावत आहेत. इथे उपचारासाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी यायचे की, नवे विकार जडवून घेण्यासाठी यायचे असा प्रश्न रुग्णांना पडला आहे. डॉक्टर आणि नर्सेस, वॉडबॉय यांचेही आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात साचलेल्या मैल्याच्या डबक्यासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी जानेवारी, मार्च व जून अशा तीन महिन्यात बोईसर ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले आहे परंतु ग्रामपंचायतीने ही या गंभीर बाबीची दखल घेतली नाही, त्या साचलेल्या डबक्यातच बाटल्या, औषधांनी भरलेले खोके टाकून देण्यांत आले आहेत. ही औषधे का टाकून देण्यांत आली त्याची चौकशी होणे गरजेचे असून योग्य विल्हेवाट न लावता जर औषधे फेकून देण्यात आली असतील तर सबंधितांवर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी नागरीक करीत आहेत. तर रुग्णालयाच्या आवारामधील डासांच्या आळ््या खाऊन डासांचा नाश करणारे गप्पी मासे पैदा करण्यासाठी खास बांधलेल्या हौदाचीही कचराकुंडी झाली आहे. तिची सफाई गेल्या अनेक महिन्यांत झालेली नाही. यामुळे संपूर्ण रुग्णालय आणि परिसराचे त्यातील कर्मचाऱ्यांचे व रहिवाशांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. याबाबत पंचायत आणि प्रशासन लक्ष घालणार तरी कधी?