लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेने प्रचाराचा नारळ भाईंदर पूर्वेच्या बीपी रोड वरील हनुमान मंदिरात दर्शन करून फोडला. यावेळी प्रचाराचा नारळ हनुमानाचा आशीर्वाद घेऊन फोडला आहे त्याच प्रमाणाने मीरा भाईंदर शहरावर वर्चस्व गाजवणाऱ्या रावणाच्या लंकेचे दहन हा हनुमान भक्त करेल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
भाईंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावरील हे जुने हनुमान मंदिर तोडण्यासाठी वीज तोडणे, पुजाऱ्यास धमकावणे आदी प्रकार झाल्याने त्याविरोधात विविध पक्ष संघटना एकत्र आल्या होत्या. त्यावेळी भाजपा आ. नरेंद्र मेहता व त्यांचे भाऊ यांच्यावर टॉवर बनवण्यासाठी मंदिर तोडले जात असल्याचे आरोप झाले. त्यानंतर मेहतांनी मंदिर तोडणार नसल्याचे म्हटले होते.
आता महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शिंदेसेनेने त्यांच्या सर्व ८१ उमेदवारांना बाळाराम पाटील मार्गावरील त्याच हनुमान मंदिर येथे नेले. त्याठिकाणी हनुमान चालिसाचे पठण व दर्शन करून प्रचार रॅलीचा नारळ मंत्री प्रताप सरनाई यांनी फोडला. यावेळी शिवसेनेच्या वचननामाची प्रत मंदिरात ठेवण्यात आली. १६ जानेवारी रोजी याच ठिकाणी विजयाचा गुलाल उधळू असे सांगत मीरा भाईंदर शहर हे स्वतःच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीचे समजून लोकांवर वर वर्चस्व गाजविणाऱ्या 'रावणाची लंका' यंदा हा हनुमान भक्त दहन करेल असे मंत्री सरनाईक म्हणाले.
भाईंदर पूर्वेच्या ह्या जुन्या हमुमान मंदिरास तोडण्यासाठी भाजपा आ. मेहता व त्यांच्या निकटवर्तीयांनी अनेक प्रयत्न केले असा आरोप शिवसेना, मनसे, काँग्रेस सह अनेक संघटना यांनी केले होते. मंदिर वाचवण्यासाठी शिवसेना शिंदेगटाने पुढाकार घेतला होता. त्याच अनुषंगाने शिवसेना शिंदेगटाने निवडणूक प्रचाराचा नारळ याच मंदिरात हनुमानाचे दर्शन घेऊन फोडला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक 'विकास आणि विश्वास' या मुद्द्यावर लढवली जात आहे असे ते म्हणाले.
Web Summary : Shinde's Sena launched its Mira Bhainder election campaign at a Hanuman temple, vowing to defeat rivals. Sarnaik accused Mehta of trying to demolish the temple, promising to end his dominance.
Web Summary : शिंदे की सेना ने हनुमान मंदिर में मीरा भाईंदर चुनाव अभियान शुरू किया, प्रतिद्वंद्वियों को हराने का संकल्प लिया। सरनाईक ने मेहता पर मंदिर को गिराने की कोशिश करने का आरोप लगाया, उनका प्रभुत्व समाप्त करने का वादा किया।