आर. के. एक्सपोर्ट विरोधात उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:52 IST2017-08-09T05:52:15+5:302017-08-09T05:52:15+5:30
स्थानिक बेरोजगारांना नोकरीत ८० टक्के प्राधान्य या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मंगळवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आर. के. एक्सपोर्ट विरोधात उपोषण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : स्थानिक बेरोजगारांना नोकरीत ८० टक्के प्राधान्य या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मंगळवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या मुळे कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्याचे नेतृत्व अमित शिर्के व दिलीप पाटील करीत आहेत.
वाडा तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मेट गावात आर. के. एक्स्पोर्ट ही कंपनी असून ती मध्ये शोभेच्या मण्यांचे उत्पादन केले जाते. तीमध्ये सुमारे ४०० कामगार असून ते सर्व परप्रांतीय आहेत. फक्त एक कामगार स्थानिक आहे. याशिवाय कंपनीचे बांधकाम, वाहतूक आदी ठेकेही परप्रांतीयांनाच दिले जातात. कंपनीचे परप्रांतीय मालक व अधिकारी हे स्थानिकांना जाणूनबुजून डावलत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.
या मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणात दिलीप पाटील, अमित शिर्के, विकास घरत, किरण जाधव, दयानंद पाटील, अमर शिर्के, विक्र म पाटील, विशाल पाटील, शैलेश पाटील, आकाश जाधव, कल्पेश ठाकरे व नवनाथ भोईर यांचा सहभाग असून इतर ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
या आंदोलनाला भाजपचे नेते व उपसभापती नंदकुमार पाटील, माजी उपसभापती मंगेश पाटील, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड , श्रमजीवीचे प्रवक्ते प्रमोद पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील, तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे नेते सुनील पाटील, सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पटारे, कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील आदींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
गावात चुली पेटणार नाहीत
आज रात्रीपर्यंत उपोषणाची दखल न घेतल्यास बुधवारी घोणसई व मेट या गावातील चुली ग्रामस्थ पेटवणार नसून लहान, तरूण , महिला, वृद्ध एक दिवस उपोषण करून निषेध नोंदविणार आहेत.