दीडशे रिसाॅर्ट बंद ठेवून वाढवण बंदराचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 00:00 IST2020-12-15T00:00:40+5:302020-12-15T00:00:48+5:30
वसई तालुक्यातील व्यावसायिकांचा पाठिंबा

दीडशे रिसाॅर्ट बंद ठेवून वाढवण बंदराचा निषेध
पालघर : वाढवण बंदरविरोधाची धग आता वेगाने पालघर जिल्ह्यासह मुंबईच्या दिशेने पसरू लागली आहे. कफपरेड, मढ येथील मासळी मार्केट बंद ठेवण्यात येऊन वसई तालुक्यातील १५० रिसॉर्टधारकांनी या बंदच्या हाकेला समर्थन देण्यासाठी आपली सर्व रिसॉर्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढवण बंदराविरोधातील लढ्याने आता व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे. डहाणू झाई-बोर्डी ते कफपरेड दरम्यानच्या सर्व मच्छीमार सहकारी संस्थांनी मासे खरेदी-विक्री, डिझेल-विक्री बंद ठेवली आहे. तर सर्व मासळी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, हॉटेल्सची उभारणी करण्यात आली आहे. अर्नाळा येथील ७०, कळंबमधील ६०, नवापूर-रानगाव २६ असे सुमारे १५० च्या वर रिसॉर्ट वाढवण बंदराला विरोध दर्शविण्यासाठी बंद ठेवण्यात आल्याचे कळंब रिसॉर्ट पर्यटन संघटनेचे अध्यक्ष धीरज निजाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढवण बंदराच्या उभारणीमुळे आमच्या मच्छीमार बांधवांच्या व्यवसायासोबतच त्यांची घरे संकटात सापडणार असल्याने त्यांच्या सोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्व रिसॉर्ट बंद ठेवल्याचे निजाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.