नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:23 PM2019-08-25T23:23:35+5:302019-08-25T23:23:44+5:30

पालघरमध्ये मनसे आक्र मक : संगणक प्रशिक्षकांची परीक्षा उधळून लावण्याचा मनसेकडून प्रयत्न

Prioritize locals over a job | नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

Next

पालघर : कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर ९ वर्षे काम करणाऱ्या स्थानिक संगणक प्रशिक्षकांना सामावून न घेता पुन्हा परीक्षा प्रक्रिया राबवून जिल्ह्याबाहेरील प्रशिक्षक भरण्याचा प्रयत्न होत असल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी परीक्षा केंद्रावर जात जोरदार आंदोलन केले. ही परीक्षा प्रक्रिया हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी त्यांना अटक केली.


शासकीय आश्रमशाळा संगणक प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित संगणक प्रशिक्षण देण्यासाठी संगणक प्रशिक्षक म्हणून अनुसूचित जमातीच्या २७ स्थानिक तरुणांची निवड झाली. एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू, जव्हारच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या वतीने कंत्राटी पद्धतीवर निवडलेल्या या २७ जणांना ४ हजार इतके अल्प मानधन दिले होते. २००९-१० च्या शासकीय परिपत्रकान्वये कुठल्याही शाखेची तत्सम पदवी आणि त्याला संलग्न असा असा संगणकाचा कुठलाही अभ्यासक्रम पूर्ण केला असेल अशा उमेदवाराची निवड करण्याची अट होती. शासनाच्या बदलत्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणाºयांना शासन कायम करण्याचा विचार करत असल्याचे आश्वासन निवडणुकांच्या तोंडावर मिळाले होते. यावर विश्वास ठेवत २७ स्थानिक प्रशिक्षक अत्यंत अल्प अशा मानधनावर ९ वर्षे काम करीत होते. या कंत्राटी ठेक्यात भ्रष्टाचार झाल्याचे कारण देत हा ठेका २०१८ साली रद्द करण्यात आला होता.


दरम्यान, संगणक प्रशिक्षकाची नेमणूक करताना २७ प्रशिक्षकांना पुन्हा मुदतवाढ मिळावी यासाठी हे प्रशिक्षक वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करीत होते. त्यामुळेच शासनाला पुन्हा कंत्राटी पद्धतीने प्रशिक्षक भरतीचे आदेश काढावे लागल्याचा दावा निलेश कासट या आंदोलनकर्त्या प्रशिक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना केला.


शासनाने संगणक प्रशिक्षक भरती परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करताना तत्सम पदवी सोबत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) आणि (बीसीए) बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अशा पदव्यांच्या शैक्षणिक पात्रतेची अट घातली. या अटी मध्ये २७ स्थानिक प्रशिक्षक बसत नसल्याने ते आपोआप या प्रक्रियेतून बाद ठरणार होते. आपण आमची नियुक्ती करावी. त्या दरम्यान आम्ही कॉम्पुटरच्या दोन्ही पदव्या प्राप्त करू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु त्यांच्या विनंतीचा साधक-बाधक विचार न करता पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात रविवारी संगणक, निर्देशक यांच्या ५७ पदांसाठी पालघरसह नंदुरबार, बुलढाणा, धुळे, वर्धा, अमरावती येथील ४७५ उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित राहिले होते. या विरोधात उभारलेल्या या लढ्याला बळ देण्यासाठी मनसेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शेकडो सैनिक उपस्थित होते.

मनसेचे शेकडो कार्यकर्ते
या २७ स्थानिक प्रशिक्षकांना प्रथम प्राधान्य द्या अशी मागणी करीत मनसेने परीक्षा केंद्रावर जोरदार निदर्शने केली. पालघर पोलिसांनी मनसेचे तालुकाध्यक्ष धीरज गावड, शहराध्यक्ष सुनील राऊत, दिनेश गवई, उदय माने, मंगेश घरत, गोपाळ वझरे, उमेश गोवारी, सुनील इभान, विशाल जाधव, नीलीम संखे, जालीम तडवी, विजय गांगुर्डे, नित्यानंद पाटील यांना अटक करत त्यांना पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले. या विरोधात उभारलेल्या या लढ्याला बळ देण्यासाठी मनसेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शेकडो सैनिक उपस्थित होते.

Web Title: Prioritize locals over a job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.