गरीब महिलांचे ५०० रुपयांचे ‘जनधन’ तीन महिने रखडले, लाभार्थ्यांना प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:18 IST2020-12-06T00:17:58+5:302020-12-06T00:18:18+5:30
गरीब महिलांना आर्थिक बळ मिळावे म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात एप्रिल, मे व जून महिन्यांच्या कालावधीत प्रतिमाह ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा केले.

गरीब महिलांचे ५०० रुपयांचे ‘जनधन’ तीन महिने रखडले, लाभार्थ्यांना प्रतीक्षा
- हुसेन मेनन
जव्हार - कोरोनाच्या काळातील टाळेबंदीमुळे कित्येकांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे गरीब महिलांना आर्थिक बळ मिळावे म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात एप्रिल, मे व जून महिन्यांच्या कालावधीत प्रतिमाह ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा केले. मात्र जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांचे १५०० रुपये अद्याप जमा झालेले नाहीत. याकडे गरीब महिलांच्या नजरा लागल्या आहेत.
जव्हार तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखेत तसेच डाक कार्यालयात जनधन योजनेची हजारो खाती आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रति महिना ५०० रुपये प्रमाणे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा केले जाणार होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात टाळेबंदी जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली आहे. परिणामी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रति महिना ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.
त्यानुसार जव्हार तालुक्यातील हजारो महिलांच्या जनधन बचत खात्यात ५०० रुपये अनुदान बँकांनी जमा केले. तालुक्यातील महिलांच्या बचत खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले होते. मात्र शासनाने जाहीर केलेले तीन महिन्यांचे अनुदान बँक खात्यात अद्याप जमा न झाल्याने जनधन खातेधारक महिला मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळालेल्या जनधन योजनेच्या ५०० रुपयांनी कुटुंबाला खूप मोठा आधार झाला होता, मात्र जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सानुग्रह अनुदान लवकर मिळावे, अशी माझ्यासारख्या बऱ्याच महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.
- छाया प्रभाकर बल्लाळ,
जनधन योजना लाभार्थी, जव्हार
गरीब योजनेतील महिलांना देण्यात येणारे जनधन खात्याचे ५०० रुपये हे केवळ चार महिन्यांसाठी होते. ऑगस्ट महिन्यापर्यंत ५०० रुपये महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
- अभिजित कुलथे,
शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र, जव्हार