ज्वेलर्स दरोड्याच्या गुन्ह्याची उकल, हजारो सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 19:55 IST2025-02-01T19:27:10+5:302025-02-01T19:55:06+5:30
Nalasopara Crime News: तब्बल १५ दिवस ६ टीमच्या ७ पोलीस अधिकारी आणि ५५ पोलीस अंमलदारांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करत हजारो सीसीटीव्ही तपासून वसईतल्या मयंक ज्वेलर्स दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळाले आहे.

ज्वेलर्स दरोड्याच्या गुन्ह्याची उकल, हजारो सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी लावला छडा
- मंगेश कराळे
नालासोपारा - तब्बल १५ दिवस ६ टीमच्या ७ पोलीस अधिकारी आणि ५५ पोलीस अंमलदारांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करत हजारो सीसीटीव्ही तपासून वसईतल्या मयंक ज्वेलर्स दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी ५ आरोपींच्या सराईत टोळीला अटक करून त्यांच्याकडून २९७ ग्रॅम सोन्याची लगड, १ पिस्टल, १ जिवंत काडतुस, दुचाकी, कोयता, कटावणी, कटर, मोबाईल व इतर सामान असे एकूण २३ लाख ३९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती शनिवारी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१० जानेवारीला वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दित अग्रवाल येथील 'कौल हेरिटेज सिटी' येथील रतनलाल सिंघवी (६९) यांच्या मालकीच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. घटनेच्या दिवशी सिंघवी यांचा मुलगा बाहेर कामानिमित्त गेल्यामुळे ते दुकानात एकटे होते. याचा गैरफायदा घेत रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी हेल्मेट व मास्क घालून दुकानात शिरले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून सिंघवी यांना जबर मारहाण केली होती. ते रक्ताच्या थारोळ्यात जखमी पडल्याची खात्री केल्यानंतर आरोपीनी ७१ लाख रुपये किंमती चे ९४९ ग्रॅम सोने लुटून येथून पोबारा केला होता. या घटनेमुळे वसईत खळबळ उडाली होती. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
६ वेगवेगळ्या पोलिसांच्या टीमने परिसरातील हजारो सीसीटीव्ही एक ते दोन वेळा फुटेज मागील १५ दिवसांपासून तपासात होते. त्यानुसार आरोपी गिरीज टोकपाडा येथे दुचाकीवरुन जाताना दिसून आले. सनसिटी येथून हा रस्ता खाडीमार्गे गिरीज टोकपाडा येथे जातो. एका दूरच्या सीसीटीव्हीमधून प्राप्त झालेल्या फुटेजमधे गाडीचा हेडलाईट व हॉर्नच्या आवाजावरुन आरोपी एका इमारतीत जाताना दिसले. पोलिसांनी केलेल्या तपासात सदर घराचा मालक रॉय सिक्वेरा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती प्राप्त झाली. येथून पोलीस चक्रे फिरू लागली. या संपूर्ण गुन्ह्याचा मास्टरमाईंड वसईतील रहिवासी व कुविख्यात आरोपी रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा वय (४६) याला गिरीज टोकपाडा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. रॉयवर यापूर्वी हत्या, चोरी, दरोडे, बेकायदा हत्यार बाळगणे अश्या बारा गुन्ह्यांची नोंद आहे.
त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून विविध ठिकाणाहून अनुप चौगुले (३६), लालसिंग उर्फ सिताराम मोरे (५६), सौरभ उर्फ पप्पू राक्षे (२७) आणि कर्नाटक येथून चार आरोपींकडून सोने खरेदी करणारा सोनार अमर निमगिरे (२१) अटक करण्यात आली आहे. अनुपवर २० गुन्हे, लालसिंगवर ३ गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी वापरलेली पल्सर दुचाकी सातारा येथून जप्त केली. आरोपींना मोक्का लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले- श्रींगी, पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक घुगे, पोनि बालाजी दहिफळे (गुन्हे), माणिकपूर व वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील व इतर पोलीस अंमलदारांनी केली आहे.