मिरा-भाईंदर, ठाण्यातही आता पॉड टॅक्सी धावणार; महामुंबईची वाहतूककोंडी फुटणार; एमएमआरडीए डीपीआर बनवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:18 IST2025-10-15T08:18:38+5:302025-10-15T08:18:49+5:30
परिवहन विभागाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सोपवल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मिरा-भाईंदर, ठाण्यातही आता पॉड टॅक्सी धावणार; महामुंबईची वाहतूककोंडी फुटणार; एमएमआरडीए डीपीआर बनवणार
- महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्येही पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मीरा-भाईंदर आणि ठाण्यात घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी होते. हे लक्षात घेता पॉड टॅक्सी प्रकल्प आकाराला आल्यास महामुंबईकरांचीही वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे, तसेच पर्यावरणपूरक पर्याय म्हणूनही हा प्रवास फायदेशीर ठरणार आहे.
परिवहन विभागाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सोपवल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. शहरांतील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन ‘उन्नत पॉडकार वाहतूक सेवा’ ही भविष्यातील एक प्रभावी पर्याय ठरू शकते, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यांनी वडोदऱ्यातील पहिल्या व्यावसायिक सस्पेंडेड पॉडकार प्रणालीचा आढावा घेतल्यानंतर मे महिन्यात मुंबई महानगर प्रदेशात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत बैठकही घेतली होती. या पार्श्वभूमीवर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे परिसरात १५ ठिकाणी पॉड टॅक्सी उभारणीसाठी एमएमआरडीएकडून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये
पॉड टॅक्सी रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता आणि कमी जागेत उभारली जाणारी यंत्रणा आहे. त्यानुसार या पॉडकारमध्ये २० प्रवासी बसू शकतात आणि ती ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावू शकत असल्याचे समोर आले. ऑनबोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी प्रणालीवर ही यंत्रणा चालते. पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ती उपयुक्त ठरेल, असे अधिकारी म्हणाले.
पॉड टॅक्सी हा जलद वाहतुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्रकल्पासाठी बीकेसीमधील जागा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केली आहे. केवळ मुंबई आणि ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्याचा मानस आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री