३ वर्षापूर्वीच्या हत्येचा पेल्हार पोलिसांनी केला उलगडा; प्रेमसंबंधातून झाली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 05:31 PM2024-04-08T17:31:44+5:302024-04-08T17:32:22+5:30

तीन आरोपींना केली अटक.

pelhar police solved the murder of 3 years ago the murder was due to love affair | ३ वर्षापूर्वीच्या हत्येचा पेल्हार पोलिसांनी केला उलगडा; प्रेमसंबंधातून झाली होती हत्या

३ वर्षापूर्वीच्या हत्येचा पेल्हार पोलिसांनी केला उलगडा; प्रेमसंबंधातून झाली होती हत्या

नालासोपारा (मंगेश कराळे) :- मनाई आदेश असताना तलवार, चाकू बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केल्यावर तिघांनी ३ वर्षांपूर्वी हत्या केलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पेल्हार पोलिसांना यश मिळाल्याची माहिती सोमवारी पोलीस उपायुक्त  जयंत भजबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून अजून एक हत्या करण्याचाही प्लॅन आखल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

धानिवबाग तलाव परिसरातून बुधवारी रात्री कोबिंग ऑपरेशन दरम्यान पेल्हार पोलिसांनी आरोपी पोखन साव (५०) आणि अब्दुल शहा उर्फ बडा (२३) या दोघांना तलवार, सुरा बाळगल्या प्रकरणी अटक केले होते. पोलिसांनी तलवार, चाकू, मोबाईल आणि रिक्षा जप्त केली आहे. या गुन्ह्याची चौकशी करत असताना हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. ३ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे येथे वकील अहमद इद्रीसी (२७) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी विरार पोलिसांनी अकस्मात नोंद केली होती. मात्र तपासामध्ये हा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचे उघड झाले आहे. मुख्य आरोपीने पोखन साव (५०), इम्रान सिद्दीकी (२७) आणि अब्दुल शाह (२३) या तिघांनी मिळून ही हत्या केली आहे.

आरोपी पोखन याचे नायगांव येथील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. पण तिचा पती वकील अहमद इद्रीसी हा अडसर ठरत असल्याने आरोपीने साथीदारांच्या मदतीने कट रचून ३ सप्टेंबर २०२१ च्या रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील बाफाणे गावाच्या हद्दीत रिक्षामध्ये बसवून शिवीगाळ, दमदाटी करत इद्रिसी याचा गळा आवळून मानेत दुचाकीची चावी भोसकून हत्या करत त्याचा मृतदेह मौजे भालीवली गावच्या हद्दीत एका खड्यात फेकून दिला होता. आरोपी त्या महिलेचा दुसरा प्रियकर विक्रम गुप्ता याचीही हत्या करण्याचा कट त्यांनी आखला होता. परंतु तो पूर्ण होऊ शकला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना पुढील तपास चौकशीसाठी विरार पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन मोहिते, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखिल मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी केली आहे.

Web Title: pelhar police solved the murder of 3 years ago the murder was due to love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.