सर्वच राजकीय पक्षांचे ‘एकला चलो रे’, जिल्हा परिषद निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:14 AM2019-12-24T00:14:37+5:302019-12-24T00:17:35+5:30

पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

palghar Zila Parishad elections of 'Ekla Chalo Re' of all political parties | सर्वच राजकीय पक्षांचे ‘एकला चलो रे’, जिल्हा परिषद निवडणूक

सर्वच राजकीय पक्षांचे ‘एकला चलो रे’, जिल्हा परिषद निवडणूक

Next

पालघरजिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी एकूण ३६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये पालघरमधून ८८, विक्रमगडमधून ७८, जव्हारमधून २०, वाडामधून ४०, मोखाडामधून १५, डहाणूमधून ७१, तलासरीमधून २९ तर वसईमधून २३ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच पंचायत समितीसाठी एकूण ६६७ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी पालघरमधून १८४, विक्रमगडमधून ९१, जव्हारमधून ४३, वाडामधून ९२, मोखाडामधून ३८, डहाणूमधून ११५, तलासरीमधून ५७, वसईमधून ४७ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांच्या आघाडी तसेच युती करून निवडणूक लढवण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार स्वतंत्ररीत्या मैदानात उतरवले आहेत.

माघारीपूर्वी की निकालानंतर आघाडी?

पारोळ : वसई तालुक्यात आठ गण आणि चार जिल्हा परिषद गटांसाठी ७ जानेवारी रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप, श्रमजीवी संघटना यांचे या निवडणुकीत गणित न जुळल्याने प्रत्येक पक्षाने आपापले स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले आहेत. थोडक्यात, यावेळी वसईतील सर्व राजकीय पक्षांनी ‘एकला चालो रे’ची भूमिका घेतली. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दरम्यान या पक्षांमध्ये युती, आघाडी व काही वाटाघाटी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसई तालुका हा नागरी, सागरी, व डोंगरी अशा स्वरूपात विस्तारला असून येथे ३१ ग्रामपंचायती आहेत. काही गावांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी ६ आणि जनआंदोलन यांनी २ जागा ताब्यात घेतल्या होत्या. त्य ावेळी शिवसेना आणि जन आंदोलन यांची युती होती. बहुजन विकास आघाडीने जास्त जागा मिळवत पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती. आधीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत असल्याने वसई पंचायत समितीतही वेगळी गणिते दिसणार. राज्यात बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. तर पालघर जिल्हात आघाडी एकत्र लढल्यास यात बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, हा एक प्रश्न आहे. श्रमजीवी संघटनाही आपले पत्ते उघड करत नसल्याने त्यांनीही पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर महाविकास आघाडीने वसई पंचायत समिती निवडणूक लढवली तर काँग्रेस व राष्ट्रवादीलाही वाटा द्यावा लागेल.
गेल्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येत बहुजन विकास आघाडी विरोधात निवडणूक लढवल्याने या निवडणुकीत शिवसेना, भाजप, श्रमजीवी संघटना, वसईपुरते तरी एकत्र येतात का, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. पण विधानसभा सभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि सर्व राजकीय समीकरणे बदलली. युती तुटल्यामुळे वसई तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत युती फिस्कटली. पक्षश्रेष्ठींनी युती-आघाडीबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने सर्व पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी प्रयत्न
वसई तालुक्यातील भाताणे, मेढे, तिल्हेर, चंद्रपाडा, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, कळंब, वासळई या आठ गणांवर पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये भाताणे गणासाठी मागासवर्ग प्रवर्ग, मेढे व अर्नाळा किल्ला गणासाठी सर्वसाधारण जागा, तिल्हेर गणासाठी मागासवर्ग प्रवर्ग महिला, चंद्रपाडा आणि कळंब येथे अनुसूचित जमाती महिला, तर वासळई गणासाठी सर्वसाधारण महिला आणि अर्नाळा येथे अनुसूचित जमाती अशा जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे पंचायत समितीच्या सर्वसाधारण आरक्षण असलेल्या जागेवर उमेदवारांची मोठी भाऊगर्दी असल्यामुळे पक्षातील अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरले आहेत.


भाजप, कुणबी सेना, श्रमजीवीची युती?
वाड्यात शिवसेना स्वबळावर? : अन्य राजकीय पक्षही रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या ७ जानेवारी २०२० रोजी होणार त्यासाठी अर्ज (नामनिर्देशन पत्र) भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. तहसीलदार परिसरात कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. वाडा तालुक्यात भाजप, कुणबी सेना आणि श्रमजीवी संघटना यांची युती होण्याची चिन्हे आहेत. तर शिवसेना स्वबळावर लढत आहे. काँग्रेस, राष्टÑवादी, निलेश सांबरे यांची विकास आघाडी, बहुजन विकास आघाडी यांची आघाडी आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, मनसे हे पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट असून पंचायत समितीचे बारा गण आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. उमेदवार तसेच त्यांच्या पाठिंब्यासाठी कार्यकर्ते यांची संख्या मोठी होती.

शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण : शिवसेनेतील निष्ठावंताना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने आबिटघर, मोज, गारगाव, पालसई या गट - गणात बंडखोरह होणार असून त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनसेची निष्ठावंतांना उमेदवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सापने, गालतरे, गारगाव आणि खुपरी या चार पंचायत समितीच्या गणात उमेदवारी अर्ज दाखल केले असून मनसेने निष्ठावंतानाच उमेदवारी दिल्याचे तालुका सचिव देवेंद्र भानुशाली यांनी सांगितले.

Web Title: palghar Zila Parishad elections of 'Ekla Chalo Re' of all political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.