पालघर जिल्ह्यात शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्यांना चारही मतदारसंघांत उमेदवारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:53 AM2019-10-03T05:53:50+5:302019-10-03T05:54:17+5:30

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत.

Outer Candidates from all four constituencies in Shiv Sena in Palghar district! | पालघर जिल्ह्यात शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्यांना चारही मतदारसंघांत उमेदवारी !

पालघर जिल्ह्यात शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्यांना चारही मतदारसंघांत उमेदवारी !

Next

- पंकज राऊत
बोईसर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. या चारही मतदार संघामध्ये शिवसेनेकडून ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली ते सर्व नव्याने शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेले आहेत.

निवडणुकीत डावलले गेल्याने नाराज होऊन जिल्ह्यातील ज्येष्ठ सेना पदाधिकारी प्रकाश निकम यांनी आपला राजीनामा पक्ष प्रमुखांकडे आज पाठविला आहे. सेना नेत्यांनी याकडे गंभीरतेने न पाहिल्यास नाराजीमध्ये वाढ होऊन निवडणुकीतील गणिते बदलून त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेले विजय पाटील यांना वसईतून, पोलीस दलातून राजीनामा देऊन शिवबंधन बांधलेले प्रदीप शर्मा, दोन टर्म बोईसरची आमदारकी घेऊन बविआघाडीतून सेनेत प्रवेश घेतलेले विलास तरे तर २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्व.खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना भाजपाने पोटनिवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्यानंतर राजकीय खेळी व भाजपाला खिंडीत पकडण्याच्या उद्देशाने शिवसेनेत घेतल्याने वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वांना उमेदवारी देऊन शिवसेनेचे इच्छुक व निष्ठावंताच्या जखमेवरच मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे.

२००९ पूर्वी उत्तर मुंबई लोकसभेचे क्षेत्र पालघरपर्यंत होते तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर व हितेंद्र ठाकूरांच्या पाठिंब्यामुळे सिनेअभिनेते गोविंदा निवडून येऊन त्यांनी खासदारकीची (अयशस्वी ) पहिली व एकमेव टर्म सोडली तर भाजपा-सेना युतीचे राम नाईकांचे अधिराज्य होते. त्यानंतर २००९ मध्ये उत्तर मुंबई व डहाणू मतदार संघाची पुनर्रचना करून वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर, विक्र मगड व डहाणू या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला.

२००९ मधील पालघर लोकसभेची पहिली निवडणूक बविआने जिंकली. परंतु त्या नंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीपैकी दोन भाजपा- शिवसेना युतीने तर २०१८ ची अत्यंत अटीतटीची झालेली पोटनिवडणूक भाजपाने सेनेच्या उमेदवाराला हरवून स्वबळावर जिंकली तर २०१९ ची निवडणुकीमध्ये भाजपाकडून राजेंद्र गावित यांना आयात करून सेना-भाजपा युतीचे शिवसेनेचे गावित जिंकले.

बोईसर विधानसभेकरिता इच्छुकांमध्ये प्रथमपासून अग्रक्र मावर असलेल्या शिवसेना पालघर उपजिल्हा प्रमुख व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी २००९ व २०१४ असे सलग दोन वेळा निवडून आलेले बविआ आघाडीचे आमदार व आता सेनेत प्रवेश केलेले विलास तरे यांच्यापेक्षाही जास्त प्रमाणात या मतदार संघात फिरून जनसंपर्क ठेवल्याचा दावा केला आहे.

बालेकिल्ला सेनेचा
पालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीसह पालघर जिल्ह्यातील उत्तर-मध्य भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तर पालघर जिल्ह्यातील उर्वरित भागातही शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. सध्या पालघर विधानसभा या एकमेव मतदारसंघात आमदार अमित घोडा व जिल्ह्यातील एकमेव खासदार राजेंंद्र गावित हे दोघेही शिवसेनेचे आहेत.

Web Title: Outer Candidates from all four constituencies in Shiv Sena in Palghar district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.