गंजाड आरोग्य केंद्रात फक्त एकच डॉक्टर
By Admin | Updated: February 12, 2017 03:05 IST2017-02-12T03:05:47+5:302017-02-12T03:05:47+5:30
डहाणू तालुक्यातील गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच डॉक्टरांना दोन वर्षांपासून सतरा आदिवासी गावांच्या आरोग्यसेवेचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.
गंजाड आरोग्य केंद्रात फक्त एकच डॉक्टर
कासा : डहाणू तालुक्यातील गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच डॉक्टरांना दोन वर्षांपासून सतरा आदिवासी गावांच्या आरोग्यसेवेचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.
या आरोग्य केंद्रात गंजाड, नवनाथ, गणेशबाग, सोमनाथ, देवगाव, माणिपूर, रायतळी, चांदवड, चरी, कोटळी, जामशेत, पारसवाडी, वसंतवाडी, गोरवाडी, आंबेसरी, नागझरी, बोंडगाव अशा आदिवासी लोकवस्ती असलेल्या १७ गावांचा समावेश होतो. तसेच या आरोग्य केंद्रात ४२ अंगणवाड्या, २५ मिनी अंगणवाड्या, २८ जि.प. शाळा, ४ आश्रमशाळा , ७ आरोग्य उपकेंद्र समाविष्ट आहेत तर ४५ हजार ३४३, लोकसंख्येचा आरोग्याचा भार त्याला सांभाळावा लागतो. दोन डॉक्टर मंजूर असतांना दोन वर्षांपासून डॉ. दीपाश्री पिळोदकर या एकच डॉक्टर आहेत.
या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी १, आरोग्यसेविका २, आरोग्य सहायक १ व शिपाई १, अशी एकूण पाच पदे रिक्त आहेत. मात्र, याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता डॉक्टरांची दोन्ही पदे भरली असून डॉ. राठोड यांची ठाणे येथे प्रतिनियुक्ती केली गेली असल्याचे सांगितले. त्यामुळे नागझरी पथकाच्या डॉ.धनगर मीना बऱ्याचवेळा आपले काम सोडून गंजाड आरोग्य केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी जातात. दरम्यान या केंद्रातील गावे ही दऱ्याखोऱ्यात असून काही २० ते २५ किमी अंतरावर आहेत. दिवसभर व रात्रीसुद्धा येथे सतत रुग्ण उपचारासाठी येतात. प्रसूती व बालकांची संख्याही जास्त आहे. आदिवासी पाड्यांवर साथीचे रोग, सर्पदंश अशा रुग्णांवर उपचार करीत असतांना कुपोषणासारख्या समस्याही भेडसावत असताना दोन डॉक्टरांची गरज असतांना दुसऱ्या डॉक्टरांची प्रतिनियुक्ती शहराकडे केली गेली असल्याने आदिवासी भागातील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळेस व गंभीर परिस्थितीत रुग्णांना डहाणू, कासा येथील सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात जावे लागते.
गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवास्थानाचीही दुरावस्था झाली आहे. १० वर्षापासून त्यांची दरूस्तीच केलेली नसून खिडक्या, दरवाजे व काही इमारतींचे पत्रे तुटले आहेत. तसेच आरोग्य
केंद्राचे बांधकाम ३० वर्षापूर्वी
केल्याने जागाही अपुरी आहे.
(वार्ताहर)