१०० सीसीटीव्हीच्या आधारे घरफोडीच्या, गुन्ह्याची उकल करण्यात विरार पोलिसांना यश घरफोडीतील ३९५ ग्रॅम सोने हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 20:28 IST2024-05-06T20:28:09+5:302024-05-06T20:28:27+5:30
विरारच्या डोंगरपाडा येथील निलप्रकाश बंगल्यात राहणारे सौरभ चौधरी (३५) यांच्या घरी २४ एप्रिलच्या रात्री लाखोंची चोरी झाल्याची घटना घडली होती.

१०० सीसीटीव्हीच्या आधारे घरफोडीच्या, गुन्ह्याची उकल करण्यात विरार पोलिसांना यश घरफोडीतील ३९५ ग्रॅम सोने हस्तगत
नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या एका बंगल्यात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीकडून तब्बल ३९५ ग्रॅम सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत भजबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विरारच्या डोंगरपाडा येथील निलप्रकाश बंगल्यात राहणारे सौरभ चौधरी (३५) यांच्या घरी २४ एप्रिलच्या रात्री लाखोंची चोरी झाल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील ४७० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. विरार पोलिसांनी २५ एप्रिलला चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून त्याआधारे संशयित आरोपी निष्पन्न झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी अंदाजे १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा पाठलाग केला. आरोपीने विरार ते बोरिवली लोकल ट्रेनने, बोरिवली येथून मानपाडा पर्यंत बसने व तेथून पुढे रिक्षाने प्रवास केल्याचे दिसून आले. आरोपी शेवटी रिक्षातून उतरलेल्या ठिकाणी असलेल्या ३०० ते ४०० झोपडपट्टीत शोध घेणे अडचणीचे असतानाही पोलीस शोध घेत होते. आरोपी हा मानपाडा येथील वसंतविहार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी सापळा रचून शिताफीने आरोपी सोनू शेख (४३) याला ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपी हा सराईत घरफोडी करणारा असून मुंबई, ठाणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये ५ गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्यापैकी २७ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ३९५ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशिलकुमार शिंदे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केलेली आहे.