लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : आर्थिक संकटाला कंटाळून ४६ वर्षीय ओलाच्या कॅब चालकाने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. नालासोपारा येथे बुधवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर चालक संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सरकारने तत्काळ याची दखल घ्यावी; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत महापालिकेच्या रुग्णालयाबाहेर या चालकांनी गुरुवारी सकाळी गोंधळ घातला.
नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागातील दुबे चाळीत मनोज सक्सेना (४६) हे परिवारासह राहत होते. त्यांनी घरी विष प्राशन केल्याचे समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने विजय नगर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती समजताच चालक संघटनांचे पदाधिकारी महापालिका रुग्णालयात जमू लागले.
या कारणामुळे उचलले टोकाचे पाऊलमनोज हे मागील अनेक वर्षांपासून ओला- उबर ॲप आधारित सेवांसाठी काम करत होते. मात्र, वाढते इंधनदर आणि कमी झालेल्या भाड्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. मागील तीन दिवसांपासून वसई-विरारमधील चालकांकडून भाडेवाढीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र, त्याकडे शासन आणि कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने निराश झालेल्या मनोज याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती सहकाऱ्यांकडून समोर येत आहे.