Navratri 2020: मूर्तिकारांचा अंबेमातेच्या मूर्तीवर अखेरचा हात; यंदा नवरात्रोत्सवावर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:59 IST2020-10-10T23:59:35+5:302020-10-10T23:59:50+5:30
संडे अँकर । घटस्थापना अवघ्या आठ दिवसांवर

Navratri 2020: मूर्तिकारांचा अंबेमातेच्या मूर्तीवर अखेरचा हात; यंदा नवरात्रोत्सवावर कोरोनाचे संकट
विक्रमगड : नवरात्रोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असून येत्या १८ आॅक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे. मात्र यंदाच्या सणांवर कोरोनाच्या संकटामुळे विरजण पडले असून सर्वच सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सवही साधेपणानेच साजरा करावा लागणार असून मूर्तिकार अंबेमातेच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात
व्यस्त आहेत.
उत्सव म्हटला की, सर्वच उद्योगधंद्यांना बहर येतो. गणेशोत्सवात गणेशमूर्ती तर नवरात्रोत्सवात अंबेमाता, नवदुर्गा, चंडिका आदी रूपांमध्ये असलेली देवीची मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांची या उत्सव काळात महत्त्वाची भूमिका असते. विक्रमगड शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून, परंपरेनुसार येथील मूर्तिकार एकनाथ व्यापारी हे देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवताना त्यांच्या चित्रशाळेमध्ये दिसत आहेत.
विक्रमगड तालुक्यात गावखेड्यांमध्ये मंडळांमार्फत एकाच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जात असून एकोप्याने हा उत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो. खेड्यापाड्यावर पारंपरिक नृत्य केले जाते. त्यामध्ये तारपा नृत्य या भागात हमखास पाहावयास मिळते. मात्र या सर्वांसाठी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुकावे लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. या वेळी एकनाथ व्यापारी यांनी सांगितले की, नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तींची संख्या कमी असते, तर गणेशमूर्तींची संख्या जास्त असते, परंतु या व्यवसायात आमच्या कुटुंबाशिवाय कुशल कारागीरांची कोरोनाच्या संकटामुळे उणीव जाणवत आहे. देवीच्या मूर्तीसाठी शाडूची मागणी अत्यल्प आहे. मात्र प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीचाच अधिक आग्रह होतो. सध्या हा व्यवसायात बारमाही झाला असून कलेची आवड असणाºया तरुणांनी या मूर्ती व्यवसायात पर्दापण करावयास पाहिजे.