अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीला अटक, पेल्हार पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 19:40 IST2025-01-18T19:40:07+5:302025-01-18T19:40:39+5:30
Nalasopara News: अपघात झाल्याचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती सपोनि व जनसंपर्क अधिकारी शिवकुमार गायकवाड यांनी शनिवारी दिली आहे.

अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीला अटक, पेल्हार पोलिसांची कामगिरी
- मंगेश कराळे
नालासोपारा - अपघात झाल्याचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती सपोनि व जनसंपर्क अधिकारी शिवकुमार गायकवाड यांनी शनिवारी दिली आहे.
१४ जानेवारीला रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वसईच्या तुंगारेश्वर फाटा येथील ब्रहा पेट्रोल पंपासमोर मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रभुकुमार झा (४२) यांना अज्ञात वाहनाने ठोकर मारल्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकारण पथकातील अधिकारी अंमलदार यांना ठोकर मारणाऱ्या वाहनाचा व आरोपी वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी योग्य त्या सूचना देऊन आदेशित केले होते.
त्यानुसार पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता असे समजले कि, प्रभुकुमार हे सनातन सिंह यांच्या क्रेनवर चालक म्हणून काम करत होते. प्रभुकुमार यांच्यासोबत सनातन सिंह यांचे भांडण झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सनातन सिंह (४९) यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला. प्रभुकुमार यांनी दारू पिऊन येऊन सनातन सिंह आणि त्यांच्या ऑफीसचे जवळच्या असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे इतर चालकांना शिवीगाळ करायचे. तसेच प्रभुकुमारमूळे त्यांचे वेळोवेळी आर्थिक नुकसान झाले होते. त्याचा राग येऊन सनातन सिंहने प्रभुकुमार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. पेल्हार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शकील शेख गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे, अभिजित नेवारे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील आणि वसीम शेख यांनी केली आहे.