Vasai Sea Viral Video: वसई किनाऱ्यापासून ६६ नॉटिकल अंतरावर खोलसमुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. ११ जानेवारीला एका व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या होत्या; परंतु घटनेस सात दिवसांचा अवधी गेला तरीही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला, याचा अंदाज कुठल्याच यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वसईतील पाचुबंदर येथील 'ओम नमः शिवाय' ही कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. जीपीएस क्रमांक ३०-१५-५५४, ७१-५८-५७६ याठिकाणी मोठे गोलाकार वर्तुळ तयार झाले होते. त्यातून मातकट रंगाचे पाणी वेगाने निघत असल्याचे निदर्शनास आले.
बोट या ठिकाणी अडकली. इंजिनाचा वेग वाढवून मच्छीमारांनी बोट बाहेर काढून त्वरित मत्स्य अधिकारी, तटरक्षक, नौदलाला माहिती दिली.
मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण
पालघर जिल्हा हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे शेकडो सौम्य धक्के या भागात सुरू असतात. हा प्रवाह भूकंपामुळे निर्माण झाला आहे का? असा प्रश्न मच्छीमारांमार्फत उपस्थित करण्यात आला होता.
सप्टेंबर २०२३ मध्ये वसईपासून ३७ किमी अंतरावर समुद्रात ३.८ तीव्रतेचा भूकंप नोंदविला होता. त्यामुळे जमीन हादरल्याचा अंदाज होता. मात्र, या बदलामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती नौदल व तटरक्षक दलाला दिलेली आहे; परंतु त्यांच्याकडून अजूनही घटनेचा खुलासा झालेला नाही. या घटनेत भूकंप किंवा तशा स्वरूपाची शक्यता नाही. ओएनजीसीच्या गॅसलाइनमुळे असे होऊ शकते. तशी माहिती अजूनही अप्राप्त आहे- दिनेश पाटील, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, ठाणे-पालघर
ज्या बोटीसोबत ही घटना घडली होती, त्यांनी माहिती दिल्यानंतर तत्काळ तटरक्षक दल व नौदलाला कळविले आहे. याशिवाय अन्य शासकीय यंत्रणांना माहिती देण्यात आलेली आहे. हे कशामुळं झालंय याची माहिती अजूनही प्राप्त झालेली नाही- विनोद लहारे, मत्स्य परवाना अधिकारी, वसई
Web Summary : A mysterious swirling ring appeared off Vasai coast, alarming fishermen. The cause remains unknown after seven days, despite naval investigation. Theories range from seismic activity to gas pipelines, but no confirmation exists, fueling local fears.
Web Summary : वसई तट पर एक रहस्यमय भंवर दिखा, मछुआरे चिंतित। नौसेना जांच के बावजूद सात दिनों बाद भी कारण अज्ञात। भूकंपीय गतिविधि से लेकर गैस पाइपलाइन तक की अटकलें, लेकिन पुष्टि नहीं हुई, जिससे स्थानीय भय बढ़ गया।