मीरा-भार्इंदरच्या १६ कराटेपटूंची चमकदार कामगिरी, पदकांची लयलूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:35 IST2018-08-22T00:34:44+5:302018-08-22T00:35:06+5:30
१७ देशांमधील दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी; क्रीडा क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव

मीरा-भार्इंदरच्या १६ कराटेपटूंची चमकदार कामगिरी, पदकांची लयलूट
भार्इंदर : कर्नाटकमधील शिमोगा येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पुपील्स आॅलिम्पिकमधील कराटे स्पर्धेत सहभागी झालेल्या मीरा-भाइंदरमधील १६ कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करत १० सुवर्णासह पाच रौप्य व १५ कांस्य पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेत भारत, अमेरिका, इंडोनेशिया, मेक्सिको, फ्रान्स, सेनेगल, नायजेरिया, श्रीलंका, जर्मनी, कॅमरून, नेपाळ, बेल्जीयम, मलेशिया, रिपब्लिक आॅफ काँगो, गॅबोन, भूतान, अँगोला या १७ देशांमधील दोन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
काता व कुमीते या प्रकारात १२ वर्षांखालील १६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. काता प्रकारात स्वर्णी राणे हिने सुवर्ण तर सैज्ञा भोगटे हिने कांस्य पदक पटकावले.
काता व कुमीते या दोन्ही प्रकारांत जान्हवी सोनावणे, हिरण्या गेहलोत व पार्थ पारेखने अनुक्रमे सुवर्ण व रौप्य, ईशान शेख, पवन पुजारी व हर्ष शेट्टीने प्रत्येकी कांस्य, पार्थ अगणानी, सैफ नागोटणे, मनवीत शेट्टी व सौरव पुत्रणने प्रत्येकी कांस्य व सुवर्ण, अभीदित्या व अबियाने प्रत्येकी कांस्य व रौप्य, अद्वैत पिल्लई व पौर्णिमा चेरावतने सुवर्ण व कांस्य अशा एकूण १० सुवर्णसह पाच रजत व १५ कांस्य पदकांची कमाई केली.
मान्यवरांनी केला गौरव
या १६ कराटेपटूंच्या चमूचे नेतृत्व प्रशिक्षक विजय शिगवण, विजय ताम्हणकर, अकलाक नागोटकर, श्रीकांत सोनावणे यांनी केले. या कराटेपटूंचा अमेरिकेचे मास्टर कराटेपटू पेरे मौदे, मलेशियाचे अनन भून, पुपील्स आॅलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोते, सचिव मोहम्मद रफीज शेख यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.