मीरा भाईंदर शहराला दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले
By धीरज परब | Updated: July 20, 2023 19:36 IST2023-07-20T19:36:04+5:302023-07-20T19:36:33+5:30
सतत कोसळणाऱ्या पावसा मुळे वारसावे नाका येथील एक्स्प्रेस इन हॉटेल समोरच्या घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते.

मीरा भाईंदर शहराला दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले
मीरारोड - मीरा भाईंदर शहराला गुरुवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला.
सतत कोसळणाऱ्या पावसा मुळे वारसावे नाका येथील एक्स्प्रेस इन हॉटेल समोरच्या घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. त्यामुळे लहान वाहने आणि दुचाकीस्वारांची अडचण झाली. उत्तन ते पाली मार्गवर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. या शिवाय शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने लोकांचे हाल झाले.
काशीगाव, सेंट झेवियर्स शाळे जवळील धोंदुलपाडा मध्ये मनोज सोनार व छोटेलाल पाल यांच्या घरावर गुरुवारी झाड पडले. त्यात घराचे पत्रे तुटले तसेच भिंती, दरवाजे, पंखे, विद्युत उपकरणे आदींचे नुकसान झाले . सुदैवाने जीवित हानी झाली नाही. प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रे आदी घटनास्थळी गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी व उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन झाड बाजूला केले.
१९ जुलैच्या सकाळी १० ते २० जुलै सकाळी १० वाजे पर्यंत शहरात २५० मिमी इतका पाऊस पडला. या काळात ५ झाडे पडल्याच्या दुर्घटना घडल्या. शिवाय शिवसेना गल्ली जवळ गॅस गळती झाल्याने काही काळ पुरवठा बंद करण्यात आला होता.