Maharashtra Election 2019: Voting in district increases but percentage will decline? | Maharashtra Election 2019: जिल्ह्यात मतदान वाढले पण टक्का घसरणार?

Maharashtra Election 2019: जिल्ह्यात मतदान वाढले पण टक्का घसरणार?

पालघर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी सकाळी सुरू झालेल्या मतदानाला पश्चिम पट्ट्यात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी पूर्व पट्ट्यातील आदिवासीबहुल मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. २०१४ च्या तुलनेत मतदारसंख्या २ लाख ९० हजार ६२३ एवढी झाली असली तरी मतदान टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे.

वाढवण बंदर उभारणीच्या हालचाली तसेच डहाणू पर्यावरण प्राधिकरण रद्द करण्याच्या दिशेने सत्ताधाऱ्यांची सुरू असलेली वाटचाल, तसेच उड्डाणपूल, चांगले रस्ते यांसारख्या साध्या सुविधाही मतदारांना मिळत नसल्याने धाकटी डहाणू, डहाणू ते केळवे (पूर्व) दरम्यानच्या सुमारे २३ गावातील मतदारांनी एकजुटीचे दर्शन घडवीत उगारलेल्या बहिष्काराच्या अस्त्राने राजकीय गोटातल्या पदाधिकारी, नेत्यांची धाकधूक वाढवली आहे.

सकाळपासूनच पश्चिम पट्ट्यात मतदारांनी मतदानकेंद्राकडे पाठ फिरविल्याने टक्केवारीत मतदान मोठ्या प्रमाणात घटल्याचे आकडेवारी वरून दिसून आले. २०१४ मध्ये पालघर विधानसभेत ६८.०४ टक्के मतदान झाले असताना २०१९ मध्ये ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४४.९ टक्केच भरली.

जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, विक्र मगड, नालासोपारा आणि वसई या पाच विधानसभा मतदारसंघातील मतदानावरही पूर्व भागातील ग्रामीण आदिवासी बहुल मतदारांचा जोर दिसून आला तर पश्चिम किनारपट्टीवर मात्र उदासीनता दिसून आली. जानेवारी महिन्यात होणाºया जिल्हापरिषदेच्या निवडणुकीसाठी सेनेला ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

पालघर मतदारसंघातील केळवे (जसोडी) पेट्रोल पम्प भागातील बुथ क्र. ३११ मध्ये सकाळी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने काही काळासाठी मतदान प्रक्रि या थांबविण्यात आली. दुसरे मशीन येऊन मतदान प्रक्रिया सुरू होईपर्यंत अनेक मतदारांनी मतदान न करताच माघारीचा रस्ता धरला.

जव्हार : विक्रमगड मतदारसंघांतर्गत जव्हार तालुक्यात सुरुवातीच्या टप्प्यात मतदारांचा उत्साह कमी होता. १२१ मतदानकेंद्रावर दोन मुस्लिम महिला मतदारांचे बोगस मतदान अनोळख्या व्यक्तीने केल्याची घटना घडली. दुपारनंतर त्या दोन महिला मतदान करण्यासाठी गेल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. त्या भुरट्या महिला बुरखा परिधान करून आल्याची माहिती बूथवरील अधिकाऱ्यांनी दिली. अशावेळी अशा मतदाराना बॅलेटवर मतदान करण्याची मुभा असल्याने या दोन्ही महिलांना बॅलेट पेपरवर मतदान करण्याची परवानगी दिली आणि त्यांनी त्यानी बॅलेट पेपरवर बंद लिफाफ्यात मतदान केले.

पारोळ : मतदानाच्या दिवशी पावसाने उसंत घेतल्याने वसई पूर्वेकडील ग्रामीण भागात मतदारांनी उत्साहाने भाग घेत मतदान केले. येथील प्रत्येक मतदार केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी होती. दरम्यान, काही मतदारांची नावे दुसºया गावातील मतदानकेंद्रावर आल्याने त्यांना मतदानासाठी त्रास सहन करावा लागला. केंद्रावर सावलीसाठी मंडप, आजारी व अपंग मतदारांसाठी व्हिलचेअर, शुद्धपाणी, अल्पोपहार ठेवल्याने मतदारांना दिलासा मिळाला. भाताणे येथे पाच किलोमीटरचा प्रवास करत मतदारांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शेतीची कामे बाजूला ठेवून मतदानासाठी वेळ काढला होता.

तलासरी : डहाणू विधानसभा मतदारासंघातील तलासरी भागात शांततेत मतदान झाले. कोणतीही अनुचित घटना न घडल्याचे तलासरी पोलिसांकडून सांगण्यात आले. कुरझे येथील केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीन काही वेळ बंद पडल्याची घटना वगळता अन्य कोठेही काहीही अडचण आली नाही. या मतदारसंघाचे भाजप उमेदवार पास्कल धनारे यांनी सकाळी सात वाजता तलासरी सुतारपाडा येथील केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले तर मनसेचे उमेदवार सुनील इभाड यांनी सूत्रकार येथे मतदान केले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होताच सावरोली, डोंगरी, तलासरी, सूत्रकार येथे सकाळपासून मतदारांच्या रांगा होत्या. दुपारपर्यंत मतदार रांगेत उभे होते, तर उपलात भागात सकाळी शुकशुकाट होता.

‘सखी’ मतदानकेंद्राचे आकर्षण

खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देण्यासाठी निवडणूक प्रशासनामार्फत ‘सखी मतदान केंद्र’ स्थापन करण्यात आले असून, पालघर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा-टेंभोडे येथे सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे या मतदान केंद्रातील सर्व कर्मचारी या महिला असून या मतदान केंद्राची आकर्षकरित्या सजावट करण्यात आली आहे. यामुळे हे केंद्र मतदारांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

भावाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवत बजावला मतदानाचा हक्क

वसई : नायगाव : कोळीवाडा येथील कैलास भालचंद्र गंगेकर याचे ११ आॅक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मतदानाच्या दिवशी, त्याचा दशक्रिया विधी असूनही त्याचा भाऊ जगदीश भालचंद्र गंगेकर याने नायगाव कोळीवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला.दरम्यान, डोक्यावरचे भावाचे छत्र हरवूनही राष्ट्रीय कर्तव्याचा विचार करून मतदान करणे, हे खरोखरच कौतुकस्पद असल्याची चर्चा रंगत होती.

Web Title: Maharashtra Election 2019: Voting in district increases but percentage will decline?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.