टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 06:29 IST2025-07-02T06:28:40+5:302025-07-02T06:29:33+5:30

जव्हार तालुक्याच्या घिवंडा या गावात खोरीपाडा, बोंडारपाडा, शिवाचा पाडा, बोरीचा पाडा तसेच हातेरी हे आदिवासीबहुल गाव-पाडे आहेत.

Life-threatening journey through tire-tube, type in Jawhar taluka: Not only is there no bridge, but even boats are not available | टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही

टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही

जव्हार : जव्हारमधील घिवंडा गावात ५२ कुटुंबे राहतात. शेती हेच त्यांचे उपजीविकेचे साधन आहे. मात्र, त्यांची शेतीही पलीकडे मोखाडा तालुक्याच्या हद्दीत आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाच्या दिवसांत त्यांना या शेतीकामासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. कारण दोन तालुक्यांमध्ये असलेली वाघ नदी दरवर्षीप्रमाणे यंदाही ओसंडून वाहते आहे. या नदीवर पूल नसल्याने शेतीसाठी पलीकडे जाण्यासाठी येथील आदिवासी दररोज टायर-ट्यूबने धोकादायक प्रवास करत आहेत.

जव्हार तालुक्याच्या घिवंडा या गावात खोरीपाडा, बोंडारपाडा, शिवाचा पाडा, बोरीचा पाडा तसेच हातेरी हे आदिवासीबहुल गाव-पाडे आहेत. शेती हेच येथील आदिवासींच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. तर जव्हारमध्ये पडणाऱ्या सततच्या पावसाने गावातील वाघ नदी सध्या ओसंडून वाहत आहे. घिवंडातील या आदिवासींची शेती ही नदीपलीकडे मोखाडा तालुक्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे एरवी थोड्याशा पाण्यातून किंवा उन्हाळ्यात आटलेल्या नदीपात्रातून प्रवास करून हे आदिवासी शेतीसाठी मोखाड्यात जातात. मात्र, सध्या शेतीची कामे सुरू असल्याने रोजच शेतकऱ्यांना तेथे जावे लागते. परंतु नदीवर पूल नसल्याने तसेच अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे नाईलाजाने आदिवासी टायर-ट्यूबवर बसून शेतात जावे लागत आहे. वाघ नदीचे पात्र खूप रुंद मोठे असून, या आदिवासींसाठी होडीदेखील उपलब्ध नाही.

पूल बांधण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

वाघ नदीवर पूल बांधावा अशी आदिवासींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले असून आणखी किती दिवस असा जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा, असा सवाल नागरिक करत आहेत.

गेल्यावर्षी हीच नदी पार करीत असताना विष्णू फुकाणे हे शेतकरी वाहून गेले. तरीदेखील सरकारला अद्याप जाग आलेली नाही.

वाघ नदीवर पूल व्हावा यासाठी माजी सरपंच शिवराम बुधर यांनी बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तोंडी व लेखी मागणी केली होती. मी स्वतः ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील पूल होण्यासाठी आग्रह धरला आहे. पण अजून त्याकडे लक्ष दिलेले नाही.

रेखा फुफाणे, सरपंच, घिवंडा

घिवंडा गावानजीक वाघ नदीच्या पलीकडे काही शेतकऱ्यांचे वनपट्टे असल्याचे समजले. येथील नागरिकांनी या नदीवर पूल व्हावा अशी मागणी केल्याचे देखील सांगण्यात आले आहे, त्याकरिता संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात येईल.

लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार

घिवंडा गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी वाघ नदीचे पात्र पार करावे लागते, त्यासाठी त्यांना टायर-ट्यूबचा वापर करावा लागतो. हे थांबावे म्हणून या नदीवर पूल व्हावा याकरिता निधी उपलब्ध केला जाईल.

हरिश्चंद्र भोये, आमदार

Web Title: Life-threatening journey through tire-tube, type in Jawhar taluka: Not only is there no bridge, but even boats are not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.