शेकोटीसाठी आलेल्या मुलावर बिबट्याची झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:48 IST2025-11-25T09:47:23+5:302025-11-25T09:48:05+5:30
Leopard Attack News: गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडत आहेत. अशात सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी नऊ वर्षांचा मुलगा घराच्या कोपऱ्यात येऊन बसताच बिबट्याने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

शेकोटीसाठी आलेल्या मुलावर बिबट्याची झेप
मोखाडा - गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडत आहेत. अशात सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी नऊ वर्षांचा मुलगा घराच्या कोपऱ्यात येऊन बसताच बिबट्याने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करताच बिबट्याने पळ काढला अन् चिमुरड्याचा जीव वाचला.
मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिंपळपाडा येथील संकेत सुनील भोये (९) हा सकाळी सहा वाजता शेकोटी पेटवण्यासाठी घराच्या कोपऱ्यात येऊन बसला. मात्र, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणातून उडी मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु आजी व त्याच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला.
‘ठाेस उपाययाेजना करा’
गेल्या काही दिवसांपासून पशूंवर हल्ला करणारा बिबट्या आता माणसांवरही हल्ला करू लागल्याने वनविभाग याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
याप्रकरणी घटनास्थळी पाहणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनी दिली.
संकेत सकाळी शेकोटी पेटवायला घराच्या बाहेर येऊन घराच्या कोपऱ्यावर बसला होता. त्याला बिबट्याने बघितले आणि कुंपणावरून उडी मारून धावून आला; परंतु माझ्या आईने व घरातील व्यक्तींनी आरडाओरड केल्याने बिबट्या तिथून पळाला. संकेतला कोणतीही इजा झाली नाही, पळताना गुडघ्याला लागले आहे; परंतु या घटनेने आम्ही प्रचंड भीतीच्या वातावरणात आहोत. वनविभागाने तत्काळ उपाययोजना करावी.
- केशव भोये, संकेतचे काका