शेवग्याने बनविले लखपती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:44 IST2018-05-22T02:44:09+5:302018-05-22T02:44:09+5:30
भातशेतीमध्ये काही मिळत नसल्याची खंत चेतन याला लहान पणापासून होती.

शेवग्याने बनविले लखपती!
विक्र मगड : पालघर जिल्ह्यातील विक्र मगड तालुक्याच्या मुहु खुर्द गावातील शिक्षक असलेल्या चेतन रमेश ठाकरे याने शेवग्याच्या शेंगांच्या पीकातून अनोखी समृद्धी प्राप्त केली आहे.
येथील शेतकरी आजही तोट्यात असलेल्या पारंपारीक भातशेतीवरच जगतो आहे. मुहु खुर्द या गावातील या तरुण शेतकऱ्यांनी मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. वडिलांच्या नावे असलेल्या जमीनीत आजपर्यंत पारंपरिक भातशेतीच केली जात होती तर त्यापैकी मुरबाड- दगडमाळ असलेली जमीन वर्षानुवर्षे पडीक अवस्थेत होती.
भातशेतीमध्ये काही मिळत नसल्याची खंत चेतन याला लहान पणापासून होती. काहीतरी वेगळे करण्याची संकल्पना त्याच्या लहानपणापासून होती. मात्र घरची परिस्थिती बेताची होती. आणि त्यातच शिक्षण सुरु होते. त्यामुळे शेतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता.
मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील शेतकºयांना एक वेगळी दिशा देण्यासाठी त्यांनी स्वत:च्या दगडाळ -माळरान असलेल्या पाऊण एकर शेतीमधे शेवंगा-मोरिंगा ह्या जातीच्या शेवग्याची लागवड केली तिचे सहा महिन्यात पीकही आले.
त्यांनी लागवडीसाठी जागा सपाट करणे, तसेच रोपे बनविणे, लागवाडी साठी खड्डे काढणे, शेणखत असा पाऊण एकर जागेसाठी एकूण १५ हजार रु पये खर्च केला आहे. त्यातच त्यांनी या शेवगा शेतीसाठी जीवामृत, शेण असे सेंद्रिय खत वापरले. त्यांनी ही शेवग्याची रोपे स्वत घरी बनविली त्यासाठी त्यांनी शेवग्याचे बी नाशीक वरु न मागविले होते.
पाऊण एकर जागेमधे ५०० झाडांची लागवड केली आहे. लागवडीसाठी त्यांनी ६ बाय ६ अंतरावर, १ बाय १ खोलीचा खड्डा खोदून रोपे लावली आहेत. त्याचे अवघ्या सहा महिन्यात उत्पादन सूरु झाले.
शेवग्यावर सहसा रोग कीड याचा प्रादूर्भाव होत नाही. शेवगा हे कमी जागेत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक आहे त्याला पाच ते सहा दिवसातून पाणी दिले जाते मोरिंगा या जातीच्या शेवग्याची शेंग जवळपास दोन फुट लांब होते. एका किलोत पाच ते सहा शेंगाच मावतात आणि शेवग्याच्या शेंगांना ५० ते ५५ रुपये प्रतीकिलो भाव मिळत असतो.
चेतन ठाकरे या शेतकºयांनी आपल्या शेतात जवळपास २ टन माल निघेल असा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यातून एक लाख ते सव्वा लाखाचे उत्पन्न येणे त्यांना अपेक्षित आहे. या शेवग्याच्या पिकामधे आंतरपीक म्हणून त्यांनी डांगर, मिर्ची, मका, टोमॅटो, झेंडू अशी विविध पीके घेतली आहेत.